नांदेड हादरले ! मुदखेड तालुक्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या
आई-वडील घरात गळफासावर, दोन मुलांनी रेल्वेखाली झोकून देत जीवनयात्रा संपविली
नांदेड प्रतिनिधी I गुरुवार, दि. २५ डिसेंबरची पहाट मुदखेड तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्याला हादरवणारी ठरली. तालुक्यातील जवळामुरार येथे एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली. कुटुंबातील आई-वडील घरात गळफासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आले, तर दोन तरुण मुलांनी रेल्वेखाली झोकून देत आत्मघात केला.
या घटनेमागे प्रथमदर्शनी आर्थिक संकट आणि कुटुंबप्रमुख असलेल्या वडिलांचा तब्बल २५ वर्षांपासून सुरू असलेला गंभीर आजार हे कारण असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे. आई-वडील स्वतः गळफासावर लटकले की मुलांनी आधी त्यांना फासावर लटकवून नंतर स्वतः आत्महत्या केली, तसेच या घटनेत घातपाताचा काही संशय आहे का, याचाही तपास पोलिसांकडून विविध अंगांनी सुरू आहे.
जवळामुरार गावातील एका छोट्या मातीच्या घरात लखे कुटुंब वास्तव्यास होते. रमेश होनाजी लखे (वय ५२) हे गेल्या २५ वर्षांपासून हृदयविकाराने त्रस्त होते. त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. दीर्घ आजारामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती ढासळली होती. चार एकर शेती मक्ता-बटाईने दिली होती. पत्नी राधाबाई रमेश लखे (वय ४८) या शेतमजुरी करून संसाराला हातभार लावत होत्या. मोठा मुलगा उमेश लखे (वय २६) मंडप डेकोरेशनचे काम करत होता, तर लहान मुलगा बजरंग लखे (वय २२) दुकानात कामाला होता.
गुरुवारी सकाळी बजरंग व उमेश यांचे मृतदेह मुगट रेल्वे स्थानक हद्दीतील रेल्वे ट्रॅकवर तुकडे झालेल्या अवस्थेत आढळून आले. ओळख पटताच गावातील नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी घरात रमेश आणि राधाबाई हे दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत आढळून आले. एका आत्मघाती निर्णयाने संपूर्ण कुटुंबच संपुष्टात आल्याने गावासह परिसरात शोककळा पसरली.
दरम्यान, या घटनेबाबत नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले की, “वडिलांचा दीर्घ आजार, त्यातून निर्माण झालेले आर्थिक संकट हे प्राथमिक कारण दिसत असले तरी शवविच्छेदन अहवालानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. आत्महत्या की घातपात, या दोन्ही शक्यतांचा विचार करून सर्व अंगांनी तपास सुरू आहे.”

