नांदेड हादरले, सैराटची पुनरावृत्ती!
तरुणाची गोळ्या झाडून हत्या ; मृतदेहाला मिठी मारत प्रेयसीने बांधली लग्नाची गाठ
नांदेड वृत्तसंस्था I प्रेमावर बंदुकीची गोळी चालवली तरी प्रेम हरत नाही, याची जिवंत साक्ष देणारी हृदयद्रावक घटना नांदेडमध्ये गुरुवारी उघडकीस आली. वडिलांसह भावांनी प्रियकरावर गोळ्या झाडून हत्या केली, तरीही प्रेयसी मात्र ताठ कणाने आपल्या प्रेमावर ठाम राहिली. अंत्यविधीपूर्वी मृतदेहाला मिठी मारत तिने अक्षरशः लग्नगाठ बांधली आणि “माझा प्रियकर जिंकला, तुम्ही हरलात” असा हंबरडा फोडत सर्वांचे मन पिळवटून टाकले.
सक्षम नावाच्या तरुणाची हत्या प्रेमसंबंधांना विरोध केल्यामुळे करण्यात आल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट झाले. इतवारा परिसरात गुरुवारी संध्याकाळी झालेल्या या हत्येनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सहा जणांना अटक केली. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांनी आरोपींची नावे जाहीर केली. हिमेश गज्जनन मामिडवार, सोमेश सुभाष लखे (२०), जय ठाकूर ऊर्फ मामिहार (४३), गजानन मानिडकर (४४), सहित ठाकूर (२५) आणि सारंडांत कुचेकर (१८) अशी आरोपींची यादी आहे.
मयत सक्षम आणि प्रेयसीचे दोन्ही भाऊ मित्र असल्याने घरात ये-जा होती. त्यातूनच दोघांचे प्रेम फुलले आणि तीन वर्षांची ही प्रेमकहाणी सात जन्माची शपथ घेऊन पुढे सरकली. मात्र मुलीच्या घरच्यांना हा संबंध मान्य नव्हता. विरोध दिवसेंदिवस तीव्र होत गेला. दोघांना वेगळे करण्याचे प्रयत्न फसताच अखेर संतापाच्या भरात वडील व दोन भावांनी मिळून सक्षमवर तीन गोळ्या झाडल्याचे समोर आले.
या हत्येनंतर तयार झालेल्या शोकाकुल वातावरणात शुक्रवारी मृतदेह मुलाच्या घरासमोर आणण्यात आला. त्याचवेळी सर्वांना थक्क करणारा प्रसंग घडला. प्रियकराच्या कपाळावर कुंकू लावून प्रेयसीने त्याच्या हातात हात घालून सातजन्माची गाठ बांधली. सभोवतालचे डोळे पाणावले, वातावरणात स्फोटक शांतता पसरली.
“माझ्या प्रियकराला तुम्ही मारलं, पण त्याचं प्रेम जिंकलं… तुम्ही हरलात,” असे ती कुटुंबियांना सुनावत हुंदके देत होती. सक्षम नाही तरी त्याच्यासोबतची नाळ आयुष्यभर जपणार असल्याचेही तिने माध्यमांसमोर सांगितले.
या भयावह घटनांनी संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून आरोपींना मृत्युदंडाची मागणी जोर धरत आहे. प्रेमकहाणीचा रक्तरंजित शेवट पाहून समाजात पुन्हा एकदा ‘सैराट’सदृश मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.