मुर्शिदाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क
वक्फ कायद्याला काही ठिकाणी समर्थन तर काही ठिकाणी मोठा विरोध केला जातोय. त्यातच पश्चिम बंगालच्या अनेक भागात शुक्रवारी वक्फ कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनाला हिंसाचाराच गालबोट लागलं. आंदोलकांनी जाळपोळ केली. वाहनं पेटवली. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीत अडथळे आणले. जमावाला नियंत्रित करताना जवळपास 10 पोलीस जखमी झाले.
शांतता राखा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती आता नियंत्रणात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांत मजूमदार यांनी या हिंसाचारावरुन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर शाब्दीक हल्ला चढवला. बंगाल पोलिसांनी X वर पोस्ट करुन माहिती दिली की, जंगीपूरच्या सुती आणि समसेरगंज येथे स्थिती आता नियंत्रणात आहे. पोलिसांनी जोरदार प्रहार करत अनियंत्रित जमावाला पांगवलं. नॅशनल हाय वे वर वाहतूक आता सुरळीत आहे. हिंसा करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं. समाजकंटकांच्या अटकेसाठी छापेमारीची कारवाई सुरु आहे. चुकीची माहिती आणि अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. अफवांवर लक्ष देऊ नका आणि शांतता राखा असं पोलिसांनी आवाहन केलं आहे.
जमाव हिंसक
मुर्शिदाबाद जिल्ह्यात सुती येथे जुम्याची नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम समुदायाचे लोक एकत्र झाले आणि वक्फ कायद्याविरोधात प्रदर्शन करतान जमाव हिंसक बनला असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. शमशेरगंज येथे डाकबंगला ते सुतिर सजुर मोडपर्यंत आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग-12 चा एक भाग बंद केला. आंदोलकांनी सुरक्षा रक्षकांवर दगडफेक केली. पोलीस व्हॅन आणि सार्वजनिक वाहनं पेटवली.
पोलीस जखमी
आंदोलकांनी पोलीस व्हॅनवर दगडफेक केली. त्यानंतर पोलीस आणि आंदोलकांमध्ये झडप झाली. यात 10 पोलिसवाले जखमी झाले. काही आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केला, असं अधिकाऱ्याने सांगितलं. त्यानंतर पोलिसांना अनियंत्रित जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. अनियंत्रित जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
मशिदीत शरण
एका अधिकाऱ्याने सांगितलं की, हिंसाचार सुरु असताना काही पोलिसवाल्यांना जवळच्या मशिदीत शरण घ्यावी लागली. जिल्हा प्रशासनाने परिस्थिती सामान्य करण्यासाठी सीमा सुरक्षा बलाला (BSF) हस्तक्षेप करण्याची विनंती केली. मालदा येथे आंदोलकांनी रेल्वे रुळावर धरणं आंदोलन केलं. त्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.