खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अवघ्या काही तासांत ठोकल्या बेड्या
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी): एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत दाखल झालेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील (सीसीटीएनएस गु.क्र. ७०६/२०२५, भा.दं.वि. कलम ३०२) मुख्य संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या (स्थागुशा) पथकाने अवघ्या काही तासांतच शिताफीने अटक करण्यात यश आले आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलाच्या वेगवान तपास यंत्रणेची छाप पुन्हा एकदा उमटली आहे.
खुनाच्या गुन्ह्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना तात्काळ सूचना दिल्या. त्यानुसार गायकवाड यांनी पोह. नितीन बाविस्कर, पोना. किशोर पाटील, पोर्क. छगन तायडे, पोकों. रविंद्र कापडणे यांसहित पथक तयार करून संशयिताचा शोध घेण्यास सुरुवात केली.
स्थागुशा पथकाने खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे नशिराबाद परिसरात सापळा रचला. या सापळ्यातून खुनातील मुख्य आरोपी योगेश संतोष पाटील उर्फ पिंटू (वय २७, रा. कासमवाडी, जळगाव) याला शिताफीने पकडण्यात आले. आरोपीला पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईसाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि जळगाव विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पोलिसांच्या तत्परतेने गुन्हेगारांना चपराक ठेवण्याचा संदेश गेला आहे. तपास अधिकृत सुरू असून, उर्वरित संशयितांवरही कडक नजर ठेवली जात आहे.


