शेतीच्या वाटणीवरून वाद; मुलाकडून वडिलांचा खून ;  अंतुर्लीत घडली घटना

0

शेतीच्या वाटणीवरून वाद; मुलाकडून वडिलांचा खून ;  अंतुर्लीत घडली घटना

मुक्ताईनगर प्रतिनिधी : तालुक्यातील अंतुरली येथे शेतीच्या वाटणीवरून झालेल्या वादातून मुलाने वडिलांवर कुऱ्हाडीच्या दांड्याने, लाथा-बुक्क्यांनी व विटांनी बेदम मारहाण करून मृत्यू ओढविल्याची संतापजनक घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा उपचारादरम्यान रविवारी, २ नोव्हेंबर रोजी पहाटे मृत्यू झाला असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी रवींद्र रमेश तायडे (वय २५, रा. इंदिरानगर, फुकटपुरा, अंतुरली) यांनी मुक्ताईनगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे चुलते जगदीश दामू तायडे (वय ७३) यांना त्यांच्या मुलगा गणेश जगदीश तायडे याने मारहाण करून ठार मारले.

फिर्यादीनुसार, गणेश हा नेहमी दारूच्या नशेत घरी येऊन आई-वडील आणि भावाशी वाद घालत असे. तायडे कुटुंबाची अंदाजे तीन एकर वारसाहक्काची शेती आंदलवाडी (ता. रावेर) येथे असून ती त्यांच्या नातेवाइक मधुकर तायडे यांच्या ताब्यात आहे. या शेतीचा नफा किंवा वाटा देण्याची मागणी गणेश सातत्याने वडिलांकडे करत होता. वडिलांनी ही मागणी फेटाळल्याने गणेश संतापला होता.

शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गणेश कामावरून घरी आल्यावर त्याचे आईशी भांडण झाले. त्यानंतर आई शेळ्यांच्या गोठ्यात गेली. रात्री साडेदहा वाजता गणेशने आपल्या चुलत भावाला रवींद्र तायडे याला “मी बापाला मारले, आता त्याला विहिरीत टाकतो” असे सांगितले. रवींद्र यांनी तात्काळ राहुल शिरतुरे, सागर गाडे आणि रोहित तायडे या मित्रांना सोबत घेऊन गोठ्याकडे धाव घेतली असता, जगदीश तायडे हे बाजेवर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले आढळले. त्यांच्या चेहऱ्यावर जखमा होत्या व हात कोपराजवळून मोडलेला होता.

राहुल शिरतुरे यांनी घटनास्थळी मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले असता, जखमी जगदीश तायडे यांनी “मला गणेशने मारले” असे स्पष्ट सांगितले. तत्काळ रुग्णवाहिका बोलावून त्यांना जळगाव शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रविवारी पहाटे पाच वाजता त्यांचा मृत्यू झाला.

मुलगा गणेश तायडे याने शेती वाटणीच्या वादातून वडिलांवर कुऱ्हाडीच्या दांड्याने, लाथा-बुक्क्यांनी आणि विटांनी हल्ला करून त्यांचा मृत्यू घडवून आणल्याची फिर्याद पोलिसात दाखल झाली आहे. मुक्ताईनगर पोलिसांनी गणेश तायडेविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.