धक्कादायक.. पत्नी दारू प्यायल्याने पतीने केला खून; पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

चाळीसगाव 

मेहुणबारे :चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे पत्नी दारू प्यायल्याने राग अनावर झालेल्या पतीने कुऱ्हाडीचा घाव डोक्यात घालून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना मेहुणबारे येथे शनिवारी (ता. १९) सकाळी उघडकीस आली आहे. पत्नीचा खून करून शेतात लपून बसलेल्या संशयितास नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहुणबारे येथील ज्ञानेश्वर माळी यांच्या काकूच्या शेतात कामाला मोहरतमाळ (ता. नेवाली, जि. बडवानी, मध्यप्रदेश) येथील कुवरसिंग चतरसिंग पावरा हा त्याच्या पत्नी व तीन मुलांसह वर्षभरापासून आलेला होता. पावरा कुटुंबीय शेतातच शेडमध्ये राहत होते.

होळीच्या सणानिमित्त आठ दिवसापूर्वी कुवरसिंग याची दोन मुले व एक मुलगी असे तिघेजण मध्य प्रदेशात आपल्या गावी गेले होेते. त्यामुळे शेतात दोेघेच पती-पत्नी राहत होते. शुक्रवारी (ता. १८) रात्री दहाच्या सुमारास कुवरसिंग पावरा व त्याची पत्नी निनूबाई यांच्यात दारू पिण्यावरून वाद झाला.

कुवरसिंग याने पत्नी निनूबाई हिस दारू का प्यायली, याचा जाब विचारून वाद घातला. या वादात कुवरसिंग याने पत्नी निनूबाईला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जमिनीवर पाडून घरातील लोखंडी कुऱ्हाड निनूबाईच्या डोक्यात घातली. या घावाने निनूबाई जमिनीवर कोसळली व तिच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्त निघू लागले. पत्नीच्या डोक्यातून रक्त निघू लागल्याने कुवरसिंगने तिच्याच लुगड्याने जमिनीवर पडलेले ते रक्त पुसले.

डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्त बाहेर येऊ लागल्याने घाबरलेल्या कुवरसिंगने कुऱ्हाड तेथेच टाकून गावात धाव घेऊन शेतमालकासह त्याच्या इतर नातलगांना पत्नी निनूबाई हीस काहीतरी झाले आहे, ती बोलत नाही, अशी बतावणी केली. त्यामुळे शेतमालकासह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता निनूबाई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली.

दारु का प्यायली, यावरून कुवरसिंग पावरा याने पत्नी निनूबाई पावरा हिच्याशी कुरापत काढून व वाद घालून तसेच तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तिच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी ज्ञानेश्वर माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड करीत आहेत. दरम्यान, संशयितास चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता त्यास पाच दिवसांची कोठडी देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.