प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
युवतीचा मृतदेह प्रियकराच्या खोलीत; प्रियकराचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ
संगमवाडी/वडगावशेरी : प्रेयसीची हत्या करून प्रियकराने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली असून संगमवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. मयत युवतीचे वडील स्वतः पुणे पोलिस दलात सेवेत असल्याने प्रकरण अधिकच संवेदनशील बनले आहे. या घटनेची नोंद येरवडा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा म्हणून करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी दिली.
मृतांमध्ये गणेश शाहूराव काळे (वय २८, रा. संगमवाडी, मूळ बीड) आणि दिव्या संतोष निघोट (वय २३) यांचा समावेश आहे. रविवारी दुपारी दिव्याचा मृतदेह गणेशच्या संगमवाडी येथील भाड्याच्या घरात आढळला, तर गणेशचा मृतदेह तळेगाव दाभाडे येथील भेगडेवाडी परिसरात रेल्वे रुळांच्या शेजारी सापडला. त्याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या माहितीनुसार, गणेश आणि दिव्या दोघेही रुबी हॉल क्लिनिकच्या पॅथॉलॉजी विभागात कार्यरत असल्याने परस्परांत प्रेमसंबंध प्रस्थापित झाले होते. मात्र अवघ्या १५ दिवसांपूर्वी दिव्याचे दुसऱ्या युवकाशी लग्न ठरले होते. लग्नाची खरेदीसुद्धा सुरू होती.
शनिवारी दिव्या घरातून “कामाला जाते, नंतर चित्रपट पाहायला जाणार असून येण्यास उशीर होईल” असे सांगून बाहेर पडली होती. मात्र ती रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही. मोबाईलही बंद असल्यामुळे कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. ती सापडत नसल्याने काळे पडळ पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रार नोंदवण्यात आली.
तिच्या मोबाईलचे लोकेशन संगमवाडी दाखवत असल्याने रविवारी सकाळी दिव्याचे वडील थेट गणेशच्या खोलीत गेले. घर आतून बंद असल्याने त्यांनी येरवडा पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दरवाजा तोडताच घरात दिव्या मृतावस्थेत आढळली आणि घटनेचा गंभीर उलगडा झाला.
याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.