गाढ झोपेत असलेल्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून हत्या !

धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथील मध्यरात्रीचा थरार ; १० वर्षीय मुलगा बचावला

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क धरणगाव ;- चारित्र्यावर संशय घेत पतीने गाढ झोपेत असलेल्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची संतापजनक घटना २६ मार्चच्या मध्यरात्री धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथे घडली. या हल्ल्यात त्यांचा १० वर्षीय मुलगा जखमी झाला असून थोडक्यात बचावला आहे.

मयत महिलेचे नाव शीतल उर्फ आरती सोमनाथ सोनवणे (वय ३२) असून, आरोपी पतीचे नाव सोमनाथ उर्फ सोन्या अशोक सोनवणे आहे. या दोघांना एक १० वर्षांचा मुलगा आणि ७ वर्षांची मुलगी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ सोनवणे याने नेहमीप्रमाणे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन वाद घातला. त्यानंतर मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या पत्नीच्या तोंडावर कुऱ्हाडीने वार करून तीला गंभीर जखमी केले. या वेळी मुलगा सिंधू सोनवणे याच्या हातावरही कुऱ्हाडीचा घाव बसला.

दोघांनाही तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान २७ मार्च रोजी मध्यरात्री शीतल सोनवणे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शीतल यांचे भाऊ भाऊसाहेब पवार यांच्या फिर्यादीवरून २८ रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, तसेच पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले, स.पो.नि. नीलेश वाघ, पो.उ.नि. संतोष पवार यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी भेट देऊन आवश्यक पुरावे गोळा केले.

या प्रकरणी आरोपी सोमनाथ सोनवणे याला अटक करण्यात आली असून पुढील तपास पो.हे.कॉ. राजू पाटील करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.