लोकशाही संपादकीय लेख

जळगाव महापालिकेच्या वतीने महापौर दीपमाला काळे यांच्या नेतृत्वात अतिक्रमण हटाव मोहिमेत सातत्य असल्याने जळगाव शहरातील अतिक्रमणधारकांना चांगलाच जरब बसला आहे. जळगाव शहरातील फुले मार्केटमधील अतिक्रमण काढून तेथे ग्राहकांना पुरता श्वास घेणे मोकळे झाले आहे. पुन्हा अतिक्रमण त्याच ठिकाणी बसून सुरू झाले, पण ते पुन्हा काढण्यात महापालिका यशस्वी झाली.
शहरातील आकाशवाणी चौक ते खोटेनगरपर्यंतची सर्व पक्की अतिक्रमणे काढून अतिक्रमणधारकांना चांगलाच चाप बसला आहे. बळीराम पेठ, सुभाष चौक आदी भागातून येलो पट्टे मारण्यात आले. त्या येलो पट्ट्याच्या आत कुणीही अतिक्रमण करणार नाही, अशी तंबी देण्यात आली आहे. त्यामुळे येलो पट्ट्यांच्या आतच अतिक्रमणधारक बसतात. तो येलो पट्टा क्रॉस झाला की महापालिकेची अतिक्रमण गाडी तेथे जाते आणि त्यांना पट्ट्याच्या आत जाण्यास मज्जाव करते.
यापूर्वी अजिंठा चौफुली ते कालिंका माता चौकातील अतिक्रमणे काढण्यात आली. त्यानंतर अजिंठा चौफुली ते कब्रिस्तानपर्यंतच्या भागातील अतिक्रमणे काढण्यात आली. आता इच्छादेवी चौक ते अजिंठा चौफुलीपर्यंतच्या दोन्ही बाजूंची अतिक्रमणे काढण्यात आली. जी अतिक्रमणे समांतर रस्त्यावर अतिक्रमण करून समांतर रस्ते पूर्ण व्यापून होती, ती सर्व अतिक्रमणे काढून त्यांचे सामान जप्त केले. काही अतिक्रमणे तर पक्की झालेली होती. ती पक्की अतिक्रमणे महापालिकेने जेसीबीद्वारे काढून टाकली. त्यामुळे इच्छादेवी चौक ते अजिंठा चौफुलीपर्यंत दोन्ही बाजूने रस्ता साफ झाला.
आता कोणतीही वाहतूक कोंडी होणार नाही किंवा कसला ही अपघात होणार नाही. दोन्ही बाजूने रस्ता क्लिअर झाल्याने छोट्या वाहनधारकांना वाहन चालवणे आता सोयीचे झाले आहे. त्यातच महामार्ग बायपासवरील वाहतूक आता एकतर्फी करण्यात आल्याने महामार्गावरील अवजड वाहने आता शहरातून येणे-जाणे कमी झाले आहे. काही अवजड वाहने अजूनही शहरातून येतातच. त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. अन्यथा या अवजड वाहनांमुळे पुन्हा अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
आतापर्यंत या दोन महिन्यांत पाच अपघात झाले आणि पाच अपघातांत पाच जणांचा बळी गेला. मुंबई, पुणे, नाशिक येथे एखादा जरी बळी अपघातात गेला, तर त्याची कितीतरी मोठ्या प्रमाणात चर्चा होते. लोकप्रतिनिधींना सळो की पळो करून सोडले जाते. पण आमच्या दोन महिन्यांत पाच बळी गेले तरी आमच्या लोकप्रतिनिधींचे काहीही बिघडले नाही. त्यांना काहीही वाटत नाही. ‘हे आमचे कामच नाही,’ अशा तोऱ्यात ते वागतात.
आमचे पालकमंत्री गुलाबराव पाटील संवेदनशील आहेत. परंतु अपघातात पाच बळी गेले तरी त्याबाबत ते एक शब्ददेखील काढत नाहीत. दुसऱ्यांचे जीवन इतके स्वस्त झाले आहे काय की, त्याविषयी इतके आपण असंवेदनशील झालो आहोत? एखाद्या अपघातात एकाचा बळी गेला, तर त्याचे कितीतरी भांडवल करता येते. पण आमचे लोकप्रतिनिधी मस्तवालपणे वागतात. त्याला आपण काय करणार?
महामार्ग बायपासवरील आसोदा रेल्वे उड्डाणपुलाच्या एका भागाचे काम अत्यंत निकृष्ट झाले आहे. त्या निकृष्ट कामाच्या बाबतीत आतापर्यंत कवित्व सुरू होते. ‘कंत्राटदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकले पाहिजे, त्याला जेलची शिक्षा झाली पाहिजे,’ असे बेंबीच्या देठापासून ओरडून हे लोकप्रतिनिधी मंडळी सांगत होती. पण केवळ सांगण्याने काम होत नाही. प्रत्यक्ष कारवाई होणे आवश्यक असते. ती कारवाई जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत त्या कंत्राटदाराचे आपण काही वाकडे करू शकत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष कृती होणे गरजेचे आहे. ती झाली पाहिजे. पण प्रत्यक्षात कृती करणार कोण, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे ‘जे जसे आहे तसे चालू द्यावे, ते आमचे काम नव्हे,’ अशा प्रकारे लोकप्रतिनिधी वागतात. त्याला आपण काय करणार?
खासदार स्मिता वाघ यांनी या आसोदा पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत तीन वेळा लेखी तक्रार केली. परंतु त्या तक्रारीची दखल न घेता त्या तक्रार अर्जाला कंत्राटदाराकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे. हे आमच्या खासदारांचे वजन म्हटले पाहिजे. ती तक्रार कुठे आणि कशी केली गेली, हे खासदार महोदयांनाच माहीत. आपण खासदार म्हणून एका भागाचे प्रतिनिधित्व करत आहात. नुसत्या तक्रारींचा दाखला घेतला जात नाही. त्याला काय म्हणावे, हेच कळत नाही.
आमदारांना तर हे कंत्राटदार ढुंकूनदेखील पुसत नाहीत. त्यामुळे त्यांची तक्रार केली काय आणि नाही केली काय, काहीही फरक पडत नाही. आपण १५ ऑगस्टपासून एकतर्फी वाहतूक सुरू होईल, असे सांगण्यात आले. पण १५ ऑगस्ट ही तारीख काही महामार्ग अथॉरिटीने पाळली नाही. अधूनमधून आताही अवजड वाहने रस्त्यातून येतात आणि जातात.
त्यात कालिंका माता चौक परिसरात एका बाजूने सिमेंट रोड बनवण्याचे काम सुरू असल्याने दुष्काळात तेरावा महिना म्हणावा, तसा प्रकार झाला असून तेथे वाहतूक कोंडी जबरदस्त होते आहे. त्यातच सिमेंट रोड बनवण्याच्या कंत्राटदाराने अचानक काम थांबवले असल्यामुळे पुन्हा एकदा वाहतूक कोंडीला निमंत्रण मिळाले आहे.
महापालिकेच्या वतीने सातत्याने अतिक्रमण काढण्याचा धडाका जरी चालू ठेवला तरी या रस्त्याच्या कामांमुळे वाहतूक कोंडी वाढते आहे. त्यातच खोटेनगर ते गुजरात पेट्रोल पंपपर्यंतचा रस्ता आता दीड महिन्यासाठी वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने पर्यायी मार्ग नसल्याने वाहतूक कोंडी मात्र वाढणार आहे, एवढे निश्चित.


