जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबई आणि मध्य प्रदेशकडे प्रवास करणाऱ्या जळगाव-भुसावळकर प्रवाशांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विशेष गाडी म्हणून धावणारी मुंबई-रिवा साप्ताहिक गाडी आता कायमस्वरूपी नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या गाडीला आता ‘सुपरफास्ट’चा दर्जा देण्यात आला असून ती नवीन क्रमांकासह रुळावर धावणार आहे.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, मुंबई-रिवा- 02187 /02188 ही विशेष गाडी आता नियमित केली आहे. त्यानुसार 20153 सीएसएमटी -रेवा साप्ताहिक सुपरफास्ट 24 एप्रिल, तर 20154 रेवा सीएसएमटी साप्ताहिक 23 एप्रिलपासून धावेल. गाडी क्र.20153 ही प्रत्येक शुक्रवारी दुपारी 1.30 वाजता मुंबई (सीएसएमटी) येथून सुटेल, तर त्याच दिवशी रात्री 7.38 मिनिटाने जळगावला तर 8 वाजून 15 मिनिटाने भुसावळ रेल्वे स्थानकांवर ही गाडी पोहोचेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 9.45 वाजता रेवा येथे पोहोचेल. तर 20154 क्रमांकाची गाडी गुरुवारी दुपारी 3.50 वाजता रेवा येथून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 4.05 ला भुसावळ तर 4.35 ला जळगाव रेल्वे स्थानकावर ही गाडी पोहोचेल यांनतर दुपारी 12.20 वा. मुंबईत पोहोचेल.
दादर, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, पिपरिया, गाडरवारा, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर आणि सतना थांबे आहेत. या सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी एकूण 22 डबे असतील. यात 1 एसी प्रथम श्रेणी, 1 एसी द्वितीय श्रेणी, 4 एसी तृतीय श्रेणी, 12 स्लीपर (शयनयान) आणि 4 जनरल डब्यांचा समावेश असेल.या निर्णयामुळे जळगाव आणि भुसावळच्या प्रवाशांना आता मुंबई किंवा उत्तर भारतात जाण्यासाठी एका हक्काच्या आणि जलद रेल्वे पर्यायाची कायमस्वरूपी सोय झाली आहे.


