राज्यात मुसळधार पावसाचा इशारा..

0

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क

राज्यात मान्सून सक्रिय झाल्यापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अशात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबईसह, कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने आज बुधवारी मुंबईसाठी यलो अलर्ट तर ठाणे आणि पालघर व लगतच्या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. इतकंच नाहीतर, समुद्राच्या पातळीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे लोकांना आज समुद्रापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आज दुपारी ४.३२ वाजता मुंबईत ३.९४ मीटर उंचीची भरती अपेक्षित आहे. तर १३ फुटांवर लाटा येण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई आणि लगतच्या भागात मंगळवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली, ज्यामुळे रेल्वे ट्रॅकसह अनेक ठिकाणी पाणी साचले. रस्त्यावर गाड्यांची वाहतूक स्थिर तर यामुळे प्रवाशांनाही फटका बसला.

मुंबईतल्या पावसाचे महत्त्वाचे अपडेट्स…
– वसई विरार शहरामधे रस्ते जलमय झाले आहेत. एक ते दोन फुटांपर्यंत पाणी आलं आहे

– दादर परिसरात जोरदार पाऊस सुरू

– ठाणे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकी पालटल्याने चालकाचा मृत्यू

– मुंबईतील दहिसर परिसरात तलावात एकाचा बुडून मृत्यू, दुसऱ्याचा शोध सुरू

– मुंबईत ५ दिवसांत जुलैच्या सरासरीच्या जवळपास ७०% पाऊस झाला

– मुसळधार पावसानंतर पवई तलाव ओसंडून वाहत आहे

– मुसळधार पावसाने मुंबईत जनजीवन विस्कळीत; आज जोरदार पावसाचा इशारा

कुठे आहे पावसाचा इशारा?

रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, नाशिक या शहरांमध्ये ८ तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर आणि साताऱ्यामध्ये हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून घाटामाथ्यावर पावसाचा जोर जास्त असेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या इतर भागांप्रमाणेच, राजापूर तालुका परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक पिके वाहून गेली आहेत. राजापूरचे अनेक भाग पुरामुळे पाण्याखाली गेले असून, पाऊस सुरू राहिल्यास स्थानिक बाजारपेठ पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची भीती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.