सावधान.. सोशल मीडियावर पोस्ट करताय; पोलिसांची आहे करडी नजर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

देशात सध्या वातावरण बिघडले आहे. देशासह राज्यात काही समाजकंटकांकडून जातीय तेढ निर्माण करत दंगली घडवून आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान राज्यात मशिदींवरील भोंग्यांबाबत वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

चार महिन्यांत एकूण 12,800 सोशल मीडियावरील पोस्ट मुंबई पोलिसांनी हटवल्या आहेत. विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात हिंसाचार आणि लोकांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु होते. त्यामुळे या पोस्टविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने जानेवारी महिन्यात 5 हजार 754, फेब्रुवारीत 4 हजार 252, मार्चमध्ये 3 हजार 958 पोस्ट हटवल्या आहेत. अशा पोस्ट ज्यामाध्यमातून समाजात हिंसाचार आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु होता. राज्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र एसआयडीची टीम दररोज 30 ते 35 समाजविरोधी पोस्टवर कारवाई करत आहे.

कोरोनापासून सोशल मीडियावर लोकांची अॅटिव्हीटी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अशा समाविरोधी पोस्टच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राजकीय पक्षांकडून कोणत्याही प्रकारचे वक्तव्य येताच सोशल मीडियावरील पोस्टची संख्या वाढतेय. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस अशा सोशल मीडिया पोस्ट आणि अकाऊंटवर लक्ष ठेवून आहे. विशेषत : समाजात द्वेष निर्माण करणाऱ्या पोस्टवर पोलिसांची करडी नजर आहे.

मुंबई पोलिसांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत जातीवरून सुरु असलेला वाद नियंत्रणात ठेवण्यासाठी सोशल मीडिया लॅब सक्रिय करण्यात आले आहेत. यामुळे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. मुंबई पोलिसांनी आत्तापर्यंत जातीय तेढ निर्माण करणाऱ्या सुमारे 3000 पोस्ट डिलीट केल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया लॅबच्या माध्यमातून सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवर कारवाई केली जाते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.