मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबईतील गोरगाव पश्चिममध्ये मन हेलावणारी घटना घडलीय. झोपडपट्टीतील एका छोट्या घरात फ्रिजचा अचानक स्फोट होऊन भीषण आग लागली, यात तिघांचा होरपळून मृत्यू झाला. रात्री दीड वाजल्यानंतर घरातून मुलांच्या किंचाळण्याचे आवाज ऐकू येत होते. त्यानंतर नागरिकांनी दरवाजा तोडून आत अडकलेल्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न निष्फळ ठरला. तसेच या आगीची माहिती मुंबई अग्निशमन दलाला देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री 3 च्या सुमारास घडली. पावस्कर कुटुंब गाढ झोपेत असताना अचानक घरातील फ्रिजचा मोठा स्फोट झाला आणि काही क्षणांतच घराला आग लागली. या आगीत संजोग पावस्कर (वय ४८) आणि त्यांची दोन मुले हर्षदा पावस्कर (19 वर्षे) व कुशल पावस्कर (12 वर्षे) यांचा मृत्यू झाला. आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी लहान मुलांनी धडपड केली. 12 वर्षांचा कुशल आग टाळण्यासाठी घरातील बाथरूममध्ये जाऊन लपला होता. मात्र, प्लास्टिक शीटमुळे आग वेगाने पसरली आणि धुराचे लोट वाढल्याने मुलांचा गुदमरून आणि होरपळून मृत्यू झाला.
.. म्हणून आई बचावली
या घटनेत सुदैवाची बाब म्हणजे मुलांची आई रात्रपाळीच्या कामावर गेली होती. त्या घरी नसल्यामुळे या भीषण आगीतून त्या बचावल्या आहेत. मात्र, एका रात्रीत आपले संपूर्ण कुटुंब गमावल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 ते 5 गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत पावस्कर कुटुंबातील तिन्ही सदस्यांचा मृत्यू झाला होता.
अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच स्थानिक नागरिकांनी बादल्यांमधून पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. वीजपुरवठा बंद करून पाण्याच्या मदतीने अखेर आग आटोक्यात आणण्यात आली. ही आग ग्राउंड प्लस एक मजली इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या इलेक्ट्रिक वायरिंग व घरगुती साहित्यापुरती मर्यादित होती. मात्र पहिल्या मजल्यावरील एका खोलीत असलेल्या तिघांच्या कपड्यांना आग लागल्याने ही दुर्घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तिघांनाही बाहेर काढून पोलिस व्हॅन व खासगी वाहनांच्या मदतीने ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले.