नगरसेवकाच्या अंत्यसंस्कारावेळी भावांवर तलवारीने हल्ला

लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुंबई 

उल्हासनगर; शिवसेना नगरसेवक आकाश पाटील (३२) यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर स्मशानभूमीतून बाहेर पडत असताना रिक्षातून आलेल्या हल्लेखोरांनी प्रसाद व बाबू पाटील या भावांवर हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांना डाेंबिवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेे आहे. याप्रकरणी हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

उल्हासनगरमधील कैलास कॉलनी परिसरातील शिवसेना नगरसेवक आकाश पाटील यांचे रात्री हृदयविकाराने निधन झाले. शेकडो जणांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी २.३० वाजता कॅम्प क्रमांक ५ येथील समतानगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

स्मशानभूमी परिसरातून बाहेर पडत असताना रिक्षातून आलेल्या एका हल्लेखोर टोळक्याने पाटील यांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या प्रसाद व बाबू या सख्ख्या भावांवर तलवारीने हल्ला केला.

या प्रकारामुळे तेथे उपस्थितीत नागरिकांची पळापळ झाली. काही नागरिकांनी हिंमत करून एका हल्लेखोराला पकडून हिललाइन पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले, तर इतर हल्लेखोर रिक्षा तिथेच टाकून पळून गेले.

रिक्षासह तलवारी, चाॅपर जप्त

नागरिकांनी पकडलेल्या हल्लेखोराची चाैकशी सुरू असल्याची माहिती पाेलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली.  हल्ल्यात जखमी झालेले सख्खे भाऊ असून, हल्लेखोर कैलास कॉलनी, जुने अंबरनाथ परिसरातील असल्याचा संशय आहे. याप्रकरणी हिललाइन पोलीस तपास करीत आहेत.

त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाईल, असे मोहिते यांनी सांगितले. हल्ल्यात वापरलेली रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यामध्ये तलवारी, चॉपर आदी घातक शस्त्रे सापडली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here