मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
रोजगाराच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. मुंबईत बाइक टॅक्सीला परिवहन मंत्रालयानं परवानगी दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने मुंबईत बाईक टॅक्सी सुरू करण्याची मागणी होत होती. सोलो प्रवास करणाऱ्या प्रवाशांना टॅक्सीचं प्रवास भाडं परवडत नाही, यामुळे मुंबईत बाईक टॅक्सीची सुरुवात करावी, अशी मागणी मुंबईकर करत होते.
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणूनही या बाईक टॅक्सीच्या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे. यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीतून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार देखील उपलब्ध होणार आहे. असं असलं तरी बाईक टॅक्सीवरून प्रवास करणाऱ्यांना विविध नियम लागू करणं आवश्यक आहे. नियमांच्या चौकटीत राहूनच बाईक टॅक्सी चालवावी लागणार आहे. यासाठी सरकारने विविध नियम बनवले आहेत.
काय आहेत नियम ?
– एका किलोमीटरसाठी तीन रुपये भाडे हा दर ठरल्याची माहिती.
– बाईक टॅक्सीमध्ये जीपीएस यंत्रणा आवश्यक असेल.
– पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशालाही हेल्मेट घालणं बंधनकारक असणार आहे.
– बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपनीकडे कमीत कमी 50 दुचाकी वाहने असणं आवश्यक.
– नोंदणी क्रमाकांची (नंबर प्लेट) पाटी पिवळ्या रंगाची असेल.
– दुचाकीसाठी विशिष्ट रंग ठरवण्यात येईल.
– बाईक टॅक्सी चालकाला बॅचची सक्ती असेल. हा बॅच परिवहन विभाग नोंदणी करून देईल.
– पोलीस पडताळणी करूनच चालक परवाना बॅच मिळणार आहे.
– महिलांसाठी खास महिला बाईक रायडर असावेत, अशी सूचना संबंधित बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपनीस देण्यात येतील.