“बिन सूरज के उगा सवेरा”: वडील मुलायम सिंह यांच्या आठवणीत अखिलेश यादवांचे भावनिक ट्विट

0

 

उत्तर प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क:

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव (Former Chief Minister of Uttar Pradesh and founder of Samajwadi Party Mulayam Singh Yadav) यांच्यावर मंगळवारी इटावा जिल्ह्यातील सैफई या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी त्यांना मुखाग्नी दिला.

यूपीच नाही तर देशाचे कणखर नेते मुलायम सिंह यांचे सोमवारी निधन झाले. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या निधनावर मुलगा अखिलेश यांनी भावनिक ट्विट केले आहे.

यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे त्यांच्या वडिलांशी घट्ट नाते होते आणि त्यांनी मुलायम सिंह यांच्याकडूनच राजकारण शिकले होते. वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर दुसऱ्या दिवशी अखिलेश यांनी ट्विटमध्ये लिहिले, “आज पहिल्यांदाच असे वाटले, सूर्याशिवाय पहाट उगवली”.

या ट्विटसोबत अखिलेश यांनी वडिलांच्या अंत्यसंस्काराचा फोटोही पोस्ट केला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की राजकीय जगतातील अनेक व्यक्ती आणि विविध क्षेत्रांशी संबंधित दिग्गजांनी सपा संस्थापकांना आदरांजली वाहिली होती. मुलायम सिंह यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सैफई येथे पोहोचले होते. राजनाथ म्हणाले, ‘पीएम मोदी इथे येऊ शकले नाहीत, पण त्यांनी मला त्यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यास सांगितले. आमचे खूप घट्ट नाते होते. मुलायमसिंह यादव हे भारतीय राजकारणातील मोठे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे जाणे देशाचे मोठे नुकसान आहे. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही सर्वजण येथे आलो आहोत. मुलायम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह अभिषेक बच्चन आणि जया बच्चनही आले होते. खासदार वरुण गांधी यांनी सैफईला भेट देऊन मुलायमसिंह यादव यांना श्रद्धांजली वाहिली.

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, यूपीचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि ब्रिजेश पाठक, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते, यांनी मुलायम सिंह यादव यांना श्रद्धांजली वाहिली.

Leave A Reply

Your email address will not be published.