मुलाच्या विरहात पित्याची जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आत्महत्या

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Krushi utpanna bazar samiti jalgaon)  बारदान शिलाईच्या कामावर असताना कांचन नगर येथील रहिवासी असलेल्या इसमाने आज गळफास (Sucide) घेतला. सोबतच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.

रमेश सुकलाल राजपूत (वय ४८, रा.कांचन नगर, जळगाव) असे गळफास घेऊन मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. रमेश राजपूत यांचा १३ वर्षीय मुलगा यश याने मकर संक्रांतीच्या दिवशी १४ जानेवारी रोजी क्षुल्लक कारणावरून गळफास घेतल्याची घटना घडली होती. या घटनेपासून मयत यशचे वडील रमेश हे तणावात असल्याचे मित्रांनी व कुटुंबीयांनी सांगितले. दरम्यान राजपूत यांनी मुलाच्या मृत्यूच्या विरहातून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

बुधवारी २ मार्च रोजी नेहमीप्रमाणे रमेश राजपूत हे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भरत प्रजापत यांच्या दुकानामध्ये बारदान शिलाईच्या कामासाठी गेले होते.गेल्या दहा ते बारा वर्षांपासून ते या ठिकाणी काम करत आहेत. सकाळी अन्य कर्मचाऱ्यांसोबत शिलाईसाठी बारदान त्यांनी काढले. त्यावेळेला “मला जरा बरे नाही वाटत, मी आत जाऊन झोपतो” असे म्हणून रमेश राजपूत हे दुकानाच्या आत मध्ये गेले. बाकी कर्मचारी हे बाहेर बसून बारदान शिलाई करीत होते. काही वेळाने कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले की, रमेश राजपूत हे बऱ्याच काळापासून बाहेर आले नाहीत. त्यांनी आत जाऊन बघितले असता, रमेश राजपूत हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.

यावेळी तातडीने कर्मचाऱ्यांनी त्यांना खाली उतरविले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.