मुक्ताईनगरची जागा शिंदे सेनेला की भाजपला?

0

 

लोकशाही संपादकीय लेख 

महाराष्ट्रात भाजपने ९९ विधानसभेच्या उमेदवारांची यादी काल रविवारी जाहीर करून बाजी मारली. महायुतीत भाजपला १५५ जागा, शिंदे यांच्या शिवसेनेला ७८ जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ५५ जागा मिळतील असा फॉर्मुला ठरल्याचे सूत्रांकडून कळते. दिल्लीमध्ये भाजप नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत हा फॉर्म्युला ठरला असला तरी, २५ ते ३० जागांवर वाद चालू असून त्यावर तोडगा लवकरच निघेल, असे मुख्यमंत्री यांनी पत्रकारांना सांगितले. काल भाजपची पहिली ९९ जणांची यादी जाहीर झाली. आज उद्या अजित पवार आणि शिंदे सेनेचे उमेदवारांची यादी जाहीर होईल. महाविकास आघाडीकडून आज उद्या उमेदवारांच्या याद्या जाहीर होतील.

 

रविवारी जाहीर झालेल्या ९९ जागांच्या यादीत जळगाव जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे. त्यात विद्यमान आमदार मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे, राजू मामा भोळे, मंगेश चव्हाण यांचा समावेश असून रावेर विधानसभा मतदारसंघातून अमोल जावळे यांना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण ११ विधानसभा मतदारसंघांपैकी जळगाव शहर, भुसावळ, जामनेर, चाळीसगाव आणि रावेत या पाच विधानसभेवर भाजपने आपले उमेदवार पहिल्या यादीत घोषित केले आहेत. सहावी जागा मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात वाद चालू असून त्यावर तोडगा निघायचा आहे, असे सूत्रांकडून समजते. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला असून ती जागा २०२४ च्या निवडणुकीमध्ये भाजपलाच मिळावी म्हणून मुक्ताईनगर मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

 

१९९० पासून मुक्ताईनगर मतदारसंघात २०१९ चा अपवाद वकळता भाजपलाच भाजपचाच उमेदवार विजयी झालेला आहे. २०१९ मध्ये भाजपचा उमेदवार अवघ्या १८०० मतांनी पराभूत झाला होता आणि अपक्ष निवडणूक लढवणारे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील हे निवडून आले होते. त्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवाराला उमेदवारी द्यावी असा आग्रह मुक्ताईनगर मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते भाजप पक्षश्रेष्ठींकडे करत आहेत. त्यासाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. परिणामी भाजप श्रेष्ठींपुढे पेच निर्माण झाला आहे. मुक्ताईनगर मतदारसंघ संघात विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील हे अपक्ष म्हणून निवडून आले असले, तरी ते शिंदे शिवसेनेचे सहयोगी सदस्य बनलेले असून ते महायुतीच्या घटक पक्षाचे आमदार आहेत. म्हणून मुक्ताईनगरची जागा शिंदे शिवसेनेला मिळाली पाहिजे, असा शिंदेंचा आग्रह आहे. त्यामुळे ‘मुक्ताईनगरची जागा भाजपला की सेनेला?’ या वादात सापडली आहे. काल पहिल्या यादीत मुक्ताईनगर मतदार संघाचा समावेश नसल्याने त्यावर तर्कवितर्क चालू आहेत. विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील म्हणतात की, “मी बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक आहे. माझे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे असून एकनाथ शिंदे साहेबांकडून मला जो आदेश मिळेल त्याचे मी पालन करेल,,” एवढी स्वच्छ भूमिका त्यांनी जाहीर केली आहे.

 

दरम्यान जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव, पारोळा एरंडोल, जळगाव ग्रामीण आणि चोपडा या विधानसभा मतदारसंघ शिंदे शिवसेनेच्या वाट्याला असल्याने तिथला वाद नाही. फक्त मुक्ताईनगर मतदार संघाचा महायुतीत पेच आहे. त्यामुळे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांचे समर्थक नाराज असून सेनेचे तिकीट मिळाले नाही तर चंद्रकांत पाटलांनी अपक्ष उमेदवारी जाहीर करून अपक्ष लढावे असा आग्रह धरला आहे. परंतु आमदार चंद्रकांत पाटील म्हणतात, ‘एकनाथ शिंदे जो आदेश देतील तो मला मान्य राहील’. दरम्यान पालकमंत्र्यांनी बंडखोरी करणाऱ्यांवर टीका करणारे वक्तव्य नुकतेच केले आहे. त्यांनी ते का केले हे कळायला मार्ग नाहीत; पण मुक्ताईनगर संदर्भात त्या टीकेचा अन्वयार्थ लावून चर्चेला उधाण आले आहे. परंतु पाच वर्षे आमदार म्हणून काम केल्यानंतर त्या आमदाराला उमेदवारी मिळत नसेल, तर त्यावेळी त्याबाबत त्या आमदाराची काय स्थिती होते, याची त्या आमदारालाच जाणीव कळते.

 

गेल्या पाच वर्षात मुक्ताईनगर बोदवड मतदार संघात आमदार चंद्रकांत पाटील यांनी अत्यंत मन ओतून विकास निधी खेचून आणले आहेत. अनेक विकासाची कामे त्यांनी गेल्या पाच वर्षात केली आहेत. बोदवड शहर आणि तालुक्यात पिण्याचे पाणी प्रश्न सुटला नाही. पाण्यासाठी बोदवडकरांना वणवण भटकावे लागते. तो बोदवडकरांचा पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटलांनी तापी नदीवरून पिण्याचे पाणीपुरवठा करणारी ९७ कोटी रुपयांची पुरवठा योजना आपल्या आमदारकीच्या काळात मंजूर करून आणली आहे. मतदारसंघात ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे पाच वर्षात निर्माण केले आहे. त्यांच्या पाच वर्षाच्या कालखंडातील विकास कामे पाहता त्यांनी मतदारसंघासाठी लक्षवेधी कामे केली आहेत. त्यामुळे महायुतीकडून त्यांना शिंदे शिवसेनेची उमेदवारी अपेक्षित आहे. ती जर नाही मिळाली तर त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो. परंतु पक्षाचा आदेश मानून काम करण्याचा त्यांनी मनोदय व्यक्त केला आहे. पाहूया काय होते.. एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे मुक्ताईनगर मतदारसंघात उमेदवारी भाजपला मिळणार की शिवसेनेला याची उत्सुकता लागली आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.