मुक्ताईनगर आक्रोश मोर्चाची शासन दखल घेईल का?

0

लोकशाही संपादकीय लेख

मुक्ताईनगर तालुका विधानसभा क्षेत्राच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड रवींद्र पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेता ॲड रोहिणी खडसे केवलकर (Rohini Khadse Kewalkar) यांच्या नेतृत्वात हा मोर्चा तहसील कार्यालयावर गेला व तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर केले. शेतकऱ्यांच्या कापसाला १५ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा अन्यथा प्रतिक्विंटल ७ हजार ५०० रुपये अनुदान मिळावे किंवा उत्पादक शेतकऱ्याला ५०० रुपये प्रति क्विंटल अनुदान द्यावे, पिकाच्या विमा पद्धतीतील जाचक अटी त्वरित दूर कराव्यात, केळीची रोपे विकत घेण्यासाठी २०१४ पूर्वी मिळणारे अनुदान पूर्ववत मिळावे आणि ते ४५ हजार वरून ५० हजार मिळावे, गहू, ज्वारी सह हरभरा खरेदी केंद्र शासनाने त्वरित सुरू करावे या सादर जन आक्रोश मोर्चाच्या प्रमुख मागण्या होत्या.

सध्या विधानसभा अधिवेशन सुरू असून विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृहात कापूस भाव आणि कांद्याच्या प्रश्नावर घमासान चर्चा झाली. शासनाने नाफेडतर्फे कांदा खरेदी करण्यात येत असल्याचे सत्ताधारी पक्षातर्फे सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात मात्र नाफेडतर्फे कांदा खरेदी होत नसल्याचे विरोधी पक्षाच्या अनेक आमदारांनी निदर्शनास आणून कापूस भाव आणि कांद्याचा प्रश्न हा सध्याच्या शेतकऱ्यांकडे ज्वलंत प्रश्न असून महाराष्ट्रातील कापूस उत्पादक आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवल्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे रोगामुळे झालेली नुकसान भरपाई द्यावी, अशा मागण्यांचा समावेश होता. या जन आक्रोश मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे कांद्याच्या माळा, केळीचे खोड, कापूस आणि बैलगाडी द्वारे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे झेंडे फडकवत होते. शासन कुंभकर्णी झोपेत असलेली प्रतिकृती मोर्चात लक्ष वेधून घेत होती.

एकंदरीत कालच्या मुक्ताईनगरच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तर्फे काढण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चाने लक्ष वेधून घेतेले होते. विधान परिषदेत आमदार एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) यांनी तारांकित प्रश्न विचारात कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचे (Abdul Sattar) लक्ष वेधले आणि विधान परिषदेत चर्चेच्या माध्यमातून कापूस कांदा भावाच्या प्रश्नांवर आवाज उठवला. विधानसभेत मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कापूस भाव आणि केळी विमा पद्धतीतील किचकट बाबींवर शासनाचे लक्ष वेधले. याचा अर्थ मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील विरोधी पक्षातर्फे भव्य मोर्चा काढून मोर्चातील आक्रोश शासनापर्यंत पोहोचविण्याचा चांगला प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांची मने जिंकून घेतली, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here