मुक्ताईनगर शहरात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा
बंदुकीचा धाक दाखवून एक लाख रुपयांची लूट
मुक्ताईनगर : प्रतिनिधी
मुक्ताईनगर शहरात काल मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या खडसे पेट्रोल पंपावर तीन अज्ञात दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत तब्बल एक लाख रुपयांची रोकड लुटून नेली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ही घटना गुरुवारी मध्यरात्री सुमारे 11 वाजेच्या सुमारास घडली. पेट्रोल पंपावर दोन कर्मचारी ड्युटीवर होते. त्यावेळी तीन युवक एका दुचाकीवरून आले. त्यांनी पंपावर पेट्रोल भरण्याचे सांगून कर्मचारी जवळ आल्यावर अचानक बंदूक दाखवली. “जे काही आहे ते द्या, नाहीतर गोळी घालू,” असा दम देत कॅश काउंटरमधील सुमारे एक लाख ररुपयेरोख रक्कम हिसकावून घेत ते तिथून पळून गेले.
घटनेनंतर घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ मुक्ताईनगर पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. पंपावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासले जात असून, चोरट्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक गुन्हे शाखेसह जिल्हा पोलीस अधीक्षकांनी देखील घटनेचा आढावा घेतला आहे.
या दरोड्यामुळे मुक्ताईनगर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनीही पोलिसांना तातडीने कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. “अशा घटना आमच्या शांत शहरात होणे ही गंभीर बाब आहे. पोलिसांनी चोरट्यांना लवकरात लवकर पकडावे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दरम्यान, स्थानिक व्यापारी आणि पेट्रोल पंप चालक संघटनांनी सुरक्षेची मागणी करत पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. रात्रपाळीतील पेट्रोल पंपांवर पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी करण्यात आली आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, या दरोड्यातील आरोपी स्थानिक नसावेत. त्यांनी चेहऱ्यावर मास्क घातले होते आणि बंदुकीसारखे शस्त्र वापरले असल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. पोलिसांनी परिसरातील सर्व टोल नाके, हायवे सीसीटीव्ही, तसेच मोबाईल लोकेशन तपासण्यास सुरुवात केली आहे.