लोकशाही संपादकीय लेख
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. त्यात अनेक ठिकाणी महायुतीतर्फे युती झाली नाही. जिल्ह्यातील मुक्ताईनगर पंचायतीच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटात समोरासमोर निवडणूक झाली. विशेष म्हणजे ही निवडणूक केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिष्ठेची बनली. अनेक वार्डात मंत्री रक्षा खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. मंत्री रक्षा खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटलांवर गुंडगिरीचे आरोप केले. पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र होती. तसेच नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत दस्तूर खुद्द ना. रक्षा खडसे यांनी आ. चंद्रकांत पाटलांच्या घरी जाऊन त्यांच्या आमदारकीला पाठिंबा दिला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जी भाजप सेनेची युती होती, ती युती नगरपंचायतीच्या निवडणुकीत मात्र फिसकटली. नुसती युती फस्कटली एवढेच नाही तर ती अत्यंत विकोपाला देखील गेली. नगरपंचायत निवडणुकीत भाजप सेनेमध्ये युती व्हावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती; पण मंत्री रक्षा खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात दिलजमाई झाली नाही.
मुक्ताईनगर शहरात तसेच तालुक्यात झालेल्या विकास कामांमुळे नगरपंचायतीत शिवसेनेच्या नगराध्यक्ष हवा, असा आग्रह असल्यामुळे आमदार चंद्रकांत पाटलांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आणि स्वतःची मुलगी संजना हिला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करून शिवसेनेचे स्वतंत्र पॅनल तयार केले. भाजपतर्फे मंत्री रक्षा खडसेंनी सुद्धा नगरपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची बनवून भाजपतर्फे स्वतंत्र पॅनल करून भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून भावना ललित महाजन यांची उमेदवारी जाहीर केली आणि भाजप शिवसेनेचे पॅनल समोरासमोर मैदानात उतरले. मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार ऍड. रोहिणी खडसे खेवलकर आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात निवडणूक झाली होती. त्यात रोहिणी खडसे आणि माजी मंत्री राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीकडून नगरपंचायत निवडणुकीतून माघार घेऊन भाजपच्या पॅनलला त्यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे निवडणुकीत वेगळीच चुरस निर्माण झाली.
आमदार चंद्रकांत पाटील आणि नामदार रक्षा खडसे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. या निवडणुकीमुळे नामदार रक्षा खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांची कसोटी लागली आहे. संपूर्ण निवडणूक आरोप प्रत्यारोपांनी गाजली. आमदार चंद्रकांत पाटील आणि आमदार एकनाथ खडसे या दोघांमध्ये अत्यंत खालच्या पातळीवर आरोप प्रत्यारोप झाले. आमदार पाटील आणि आमदार खडसे हे दोघे कसे सराईत गुन्हेगार आहेत, यांचा पाढा वाचला गेला. त्यामुळे ही निवडणूक भाजप बरोबर खडसे परिवारासाठी सुद्धा प्रतिष्ठेची बनली.
दोन डिसेंबरला मतदान होऊन 3 डिसेंबरला लागणारे निकाल कोर्टाच्या आदेशानुसार आता 21 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. निकालाची आता प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान 21 डिसेंबरच्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निकालानंतर लागलीच 23 डिसेंबर पासून राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. मुक्ताईनगर पंचायत निवडणुकीचा निकाल काय लागतो, त्यावर आगामी मुक्ताईनगर तालुक्यातील दिशा ठरवली जाणार आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. हा निकाल नामदार रक्षा खडसे म्हणजे भाजपच्या बाजूने लागला तर मुक्ताईनगर तालुक्याच्या राजकारणात नामदार रक्षा खडसेंची प्रतिष्ठा वाढेल. तसेच भविष्यात शिवसेनेच्या राजकारणाला ओहोटी लागण्याची शक्यता आहे. जर नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेच्या बाजूने कौल मिळाला, तर शिवसेना पक्षाची आणि वैयक्तिक चंद्रकांत पाटील यांची तालुक्यातील राजकारणावर पकड निर्माण झाली, असे म्हणायला वाव मिळेल. त्यामुळे मुक्ताईनगर पंचायत निवडणूक निकाल म्हणजे मुक्ताईनगर तालुक्याच्या आगामी राजकारणासाठी टर्निंग पॉईंट ठरेल यात शंका नाही.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे माघार घेण्यात आली. ‘आमची ताकद नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस नगरपंचायत निवडणूक लढावणार नाही’, असे आमदार एकनाथ खडसे यांनी जाहीर केल्याने आपल्या सुनेला म्हणजे ‘मंत्री रक्षा खडसेंना पाठिंबा देण्यासाठी एकनाथ खडसेंनी केलेली खेळी आहे’, असा आरोप आमदार चंद्रकांत पाटलांनी केला. राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसेंनी काय करावे? काय करू नये? हे चंद्रकांत पाटील ठरवणारे कोण? एकंदरीत मुक्ताईनगर भाजप विरुद्ध शिवसेना सामना समोरासमोर रंगला. भाजप आणि शिवसेनेत या निमित्ताने फुट पडणे आमदार एकनाथ खडसेंना आवश्यक होते. त्या दृष्टीने त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलेली खेळी योग्यच म्हणावी लागेल. परंतु आता नगरपंचायत निवडणूक निकालाने नामदार रक्षा खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांचे भवितव्य ठरणार असले, तरी चंद्रकांत पाटलांच्या विरोधात निकाला गेला तर त्याचा मोठा फटका आमदार चंद्रकांत पाटलांना बसणार आहे, एवढे मात्र निश्चित. बघूया 21 डिसेंबरचा निकाल कोणता कौल देतो! तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार..!

