जळगाव/मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर हे अमली पदार्थ तस्करीचे केंद्र म्हणून प्रकाशात येत असून मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातून मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्रीसाठी आणला जात असून त्याला स्थानिक पुढाऱ्याचा वरदहस्त असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेचे ज्येष्ठ सदस्य एकनाथराव खडसे यांनी सभागृहात केला. यावेळी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
श्री. खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील अवैध धंद्यांबाबत सभागृहात निवेदन केले. मुक्ताईनगरात मध्यप्रदेश, गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर गुटखा, अफू, गांजा यांचा पुरवठा होत असून काही स्थानिक पुढारी व कार्यकर्ते यात गुंतल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांवर हे पुढारी दडपण टाकत असल्याने हे धंदे मोठ्या प्रमाणावर वाढले असून यावर काय कारवार्इ करणार? असा प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देतांना सांगितले की, अमली पदार्थांच्या तस्करीवर निर्बंध घालणाऱ्या ‘नार्कोटिक्स ड्रग्ज ॲन्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट’ (एनडीपीएस) अंतर्गत अटक झालेले आरोपी जामीन मिळाल्यानंतर पुन्हा तोच गुन्हा केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अर्थात ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यात येईल. त्यासाठी याच अधिवेशनात कायद्यात सुधारणा करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
सदस्य डॉ. परिणय फुके यांनी अमली पदार्थ तस्करीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडली. ‘राज्यात प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र एनडीपीएस शाखा स्थापन करण्यात आल्या असून, त्यात अधिकारी व अंमलदारांची नियुक्तीही केली आहे. जिल्हास्तरावर समन्वय समित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत. यात गेल्या दोन-अडीच वर्षांत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे’, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, अमली पदार्थांच्या तस्करीची गंभीर प्रकरणे जलदगती न्यायालयात चालवण्याची विनंती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
तासांचे पालन न केल्यास कारवाई1
पोलिसांचे कामाचे तास आठ करण्याचा प्रयोग मुंबईत राबवण्यात आला. काही वेळा सण-उत्सव किंवा बंदोबस्ताच्या वेळी यात अपवाद असतात, तरीही एकूणच पोलिसांची ड्यूटी आठ तासांची करण्यात आली आहे. जिथे याचे पालन केला जात नाही, तिथे कारवाई केली जाईल, अशी ग्वाही पोलिसांच्या कामाच्या प्रदीर्घ वेळेबाबत उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी दिली.

