वृद्धांसाठी तीर्थ दर्शन योजना कायमस्वरूपी राबवावी..! 

0

लोकशाही संपादकीय लेख 

आगामी विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, लाडका भाऊ योजना आदी राबविले जात आहे. येत्या दोन महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला फायदा व्हावा या उद्देशाने या योजना महायुती सरकारच्या वतीने राबविल्या जात आहेत. त्याचप्रमाणे वृद्ध अर्थात जेष्ठ नागरिकांची मते मिळावीत म्हणून वृद्धांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुद्धा राबविण्यात आली असून तीर्थदर्शनाच्या पहिल्या टप्प्यात जळगाव जिल्ह्याचा पहिला नंबर लागला. सोमवारी सकाळी जिल्ह्यातील ४६० भाविकांना घेऊन भारत गौरव पर्यटन रेल्वे अयोध्ये कडे रवाना झाली. त्याला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व खासदार स्मिता वाघ यांनी हिरवा झेंडा दाखवून सदर ट्रेन अयोध्याकडे रवाना केली. ही भारत गौरव पर्यटन रेल्वे पूर्णतः वातानुकुलीत असून सोमवारी ३० सप्टेंबरला अयोध्येकडे रवाना होऊन ४ ऑक्टोबरला  जळगावला परत येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील ४६० वृद्ध भाविकांची निवड तालुका निहाय लोकसंख्येनुसार लॉटरी काढून करण्यात आली असून समाज कल्याणच्या वतीने ही योजना राबविण्यात येत आहे.

पहिल्या टप्प्यात आणि पहिल्या ट्रेनमध्ये भाविकांना जाण्यासाठी केलेल्या निवडीत प्रथमदर्शनी निपक्षपातीपणे निवड केल्याचे दिसते. तथापि त्याबाबत टीकाटिप्पणी नंतर होईल, परंतु वृद्ध भाविकांच्या निवड पक्षपातीपणा व्हायला नको. लोकप्रतिनिधींचा यात हस्तक्षेप होण्याची दाट शक्यता आहे. ती होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने स्वतःही योजना राबविण्यात आवश्यक आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या भाविकांच्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर जी प्रतिक्रिया दिली त्यावरून पहिल्या टप्प्यातील पहिल्या भाविकांच्या रेल्वेत निवड करताना पक्षपातीपणा झालेला नसावा, असे वाटते. त्यामुळे जिल्ह्यातील वृद्ध भाविकांच्या निवडीसाठी जे निकष लावले आहेत, तेच निकष कायम राखावेत. अन्यथा ही योजना बदनाम होऊ शकते. ही योजना बदनाम होणार नाही याचा कटाक्ष जिल्हा प्रशासनाने पाळावा ही अपेक्षा आहे.

विधानसभा निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने का असेना, वृद्धांची आठवण सत्ताधारी शासनाला झाली हे विशेष होय. जळगावहून अयोध्यकडे भारत गौरव पर्यटन रेल्वे निघाल्यापासून अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेतल्यापासून ते परत जळगावला वृद्ध भाविकांची रेल्वे पोहोचेपर्यंतची सर्व व्यवस्था आणि त्याचे नियोजन आयआरसीटीकडे देण्यात आले आहे. आयआरसीटीकडून वृद्ध भाविकांची व्यवस्था कशी केली जाते, याबाबतची माहिती जळगावला भाविक पोहोचल्यानंतरच मिळू शकते. यात्रेकरू भाविक सर्व वृद्ध असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. त्याबाबत काही गैरसोय आढळल्यास ही बाब दुसऱ्या टप्प्यात जाणाऱ्या वृद्ध भाविकांच्या संख्येवर परिणाम करणारी ठरेल. म्हणून वृद्ध भाविकांसाठी योग्य त्या सोयीसुविधा रेल्वेतर्फे पुरवणे आवश्यक आहे. जाणे आणि येणे हा पाच दिवसांचा प्रवास असल्याने सर्व भाविक सुखरूप परत येणे अपेक्षित आहे. भाविकांच्या रेल्वे प्रवासाला अथवा दर्शनाच्या प्रसंगाला गालबोट लागणार नाही, याची काळजी संयोजकांनी घेणे अपेक्षित आहे. संपूर्ण वातानुकूलित भारत गौरव पर्यटन रेल्वे असल्याने काही वृद्धांना वातानुकूलनाचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यासाठी  सुद्धा योग्य ती दक्षता घेणे आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यातील मुख्यमंत्री वृद्ध भाविक तीर्थ दर्शन योजना सुखरूप पार पडावी याच शुभेच्छा…!

Leave A Reply

Your email address will not be published.