मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. महिला व बालविकास विभागाकडून अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ही रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. तर, पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या महिलांना 500 रुपयांचा हप्ता दिला जातोय.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम यापूर्वी जाहीर करण्यात आल्याप्रमाणं अक्षय्य तृतीयेला वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावरती हा हप्ता देण्यासाठी सकाळपासून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. किती महिलांना एप्रिलचा हप्ता मिळाला हे दोन दिवसात स्पष्ट होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात करताना दोन शासन निर्णय जारी केले होते. दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येतो. इतर शासकीय योजनांचा १५०० रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे. त्याच शासन निर्णयाला अनुसरून पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान योजनेतून सर्वसाधारणपणे दरमहा 1000 रुपये लाभ घेत असलेल्या 774148 महिलांना उर्वरित फरकाचे 500 रुपये सन्मान निधी म्हणून मिळतील.