लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 पुढे ढकलण्यात आली असून, आता ही परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 ऐवजी 3 जानेवारी 2027 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा केंद्रांवर प्रचलित ऑफलाइन OMR पद्धतीने ही परीक्षा पार पडणार आहे.
या परीक्षेसंदर्भातील जाहिरात क्रमांक 017/2026 असून ती 25 जून 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी घेण्यात येणार होती. मात्र, विविध प्रशासकीय आणि स्थानिक बाबींचा आढावा घेतल्यानंतर आयोगाने परीक्षेची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता सुधारित वेळापत्रकानुसार 3 जानेवारी 2027 रोजी परीक्षा घेण्यात येईल.
परीक्षा शांततापूर्ण, सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी विविध बाबींचा विचार करण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील परीक्षा उपकेंद्रांची उपलब्धता, तसेच जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेले अहवाल यांचा या निर्णयासाठी विचार करण्यात आला आहे.
याशिवाय, सणासुदीचा कालावधी, स्थानिक परिस्थिती आणि वाहतूक व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला. उमेदवारांना परीक्षा केंद्रांवर सुरक्षितपणे आणि वेळेत पोहोचता यावे, यासाठी या बाबी महत्त्वाच्या असल्याचे आयोगाने नमूद केले आहे. राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2026 चे नियोजन, इतर भरती संस्थांच्या परीक्षांचे वेळापत्रक तसेच राज्य शासनाचे हिवाळी अधिवेशन या बाबींचाही परीक्षेच्या तारखेबाबत निर्णय घेताना विचार करण्यात आला आहे.

दरम्यान, परीक्षेचे केंद्र, प्रवेशपत्र, परीक्षेची वेळ आणि इतर आवश्यक सूचना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी आयोगाच्या सूचनांकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर किंवा अनधिकृत माहितीकडे लक्ष न देता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी, असे आवाहन आयोगाने केले आहे. गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनी सुधारित तारखेनुसार म्हणजेच 3 जानेवारी 2027 रोजी होणाऱ्या परीक्षेच्या तयारीचे नियोजन करावे.

