चाळीसगाव तालुका भाजपात शह काटशहाचे राजकारण

0

लोकशाही संपादकीय लेख

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे (BJP) तत्कालीन उमेदवार उन्मेष पाटील (MP Unmesh Patil) यांच्या निवडणुकीची धुरा आताचे आ. मंगेश चव्हाण (BJP MLA Mangesh Chavan) यांच्याकडे होती. उन्मेष पाटील आणि मंगेश चव्हाण हे जिवलग मित्र होते. त्या वेळेच्या आमदारकीच्या विजयात आ. मंगेश चव्हाण यांचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत माजी आ. स्मिता वाघ (Former MLA Smita Wagh) यांना जाहीर झालेली जळगाव लोकसभेची उमेदवारी ऐनवेळी नाट्यमयरित्या रद्द होऊन उन्मेष पाटलांचे नाव जाहीर झाले. खा. उन्मेष पाटील जळगाव लोकसभा मतदारसंघातून (Jalgaon Lok Sabha Election) प्रचंड मताने विजय झाले. त्यानंतर झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत खा. उन्मेष पाटलांकडून त्यांचा त्यांच्या पत्नीला चाळीसगाव विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून भाजपकडे आग्रह धरला होता. जिवलग मित्र मंगेश चव्हाण यांनी खा. उन्मेष पाटलांच्या पत्नीला उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करावे, अशी इच्छा होती. तथापि आ. मंगेश चव्हाण यांना चाळीसगाव तालुका विधानसभेची उमेदवारी मिळाली तेव्हापासूनच या दोन्ही मित्रांमध्ये कुरबुर सुरू झाली. आ. मंगेश चव्हाण विधानसभा निवडणुकीत पराभूत कसे होतील, अशी व्यूहरचना केल्याचा त्यांच्यावर आरोप झाला. परंतु मंगेश चव्हाण विजयी झाले. तेव्हापासून हे दोघे मित्र भाजपचेच असले तरी त्यांचे झेंडे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असल्याचे स्पष्ट दिसत होते.

आ. मंगेश चव्हाणांवर गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा वरदहस्त असल्याने आ. मंगेश चव्हाण यांचे पक्षात वर्चस्व निर्माण झाले. खा. उन्मेष पाटलांना साईडला केले गेले. जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीत (Jalgaon Jilha Dudh Sangh) मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनी आ. मंगेश चव्हाण यांच्यावर विश्वास टाकून प्रचाराची प्रमुख जबाबदारी टाकली. ती जबाबदारी मंगेश चव्हाण यांनी सार्थरित्या पार पाडली. त्याची बक्षिसी म्हणून आ. चव्हाण बिनविरोध चेअरमन बनले. संपूर्ण दूध संघाच्या निवडणूक प्रचारात खा. उन्मेष पाटील एकदम सायलेंट होते. दरम्यान चाळीसगाव येथील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ (Chalisgaon Rashtriya Sahakari Shikshan Prasarak Mandal) या तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक घोषित झाली. या निवडणुकीत आ. मंगेश चव्हाण आणि खा. उन्मेष पाटील यांनी सुरुवातीलाच प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही. अरुण निकम यांचे नेतृत्वात विकास पॅनल आणि डॉ. चव्हाण यांचे नेतृत्वात य. ना. चव्हाण स्मृती पॅनल यामध्ये निवडणूक होईल असे चित्र होते. आणि अरुण निकम यांचे विकास पॅनल सहज बाजी मारेल असा प्रचार आणि प्रसार होत होता. तथापि संस्थेच्या जागेचा वाद निर्माण झाला आणि आ. मंगेश चव्हाणांवर खा. उन्मेष पाटलांनी आरोप केले. त्यानंतर आ. मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन खासदारांवर अप्रत्यक्षरीत्या प्रत्यारोप करून हल्लाबोल केला. अरुण निकम यांच्या विकास पॅनलला समर्थन केले. त्यात माजी मंत्री सुरेश दादा जैन यांनीही उडी घेतली.

आ. मंगेश चव्हाण यांच्या आरोपाचे खा. उन्मेष पाटलांनी खंडन करून काही य. ना. चव्हाण स्मृती पॅनल त्यांचे असल्याचे स्पष्ट केले. चव्हाण स्मृती पॅनल मध्ये खुद्द खा. उन्मेष पाटलांच्या वडिलांनी उमेदवारी लढवली होती. आ. मंगेश चव्हाण यांच्या चव्हाण यांचे वक्तव्य सभासदांना समजले नाही. दोन दिवस खा. उन्मेष पाटलांनी चक्रे फिरवली आणि ही निवडणूक निकम चव्हाण यांच्या पॅनलमध्ये असली, तरी त्यात आमदार आणि खासदारांच्या पॅनलमध्ये असल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाले. या राष्ट्रीय सहकारी शिक्षण संस्थेची निवडणूक खा. उन्मेष पाटलांनी एकतर्फी खेचून आणली आणि मंगेश चव्हाण यांच्या वाट्याला दारुण पराभव आला. दोन जिवलग मित्रांमध्ये राजकारणाने अशा प्रकारे एकमेकांमध्ये अंतर निर्माण झाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील उट्टे खा. उन्मेष पाटलांनी काढले.

चाळीसगाव तालुक्यातील भाजप मधील सुंदोपसुंदी या शिक्षण संस्थेच्या निवडणुकीने उघड झाली. तालुक्यातील एका मोठ्या आणि महत्त्वाच्या शिक्षण संस्थेवर खा. उन्मेष पाटलांनी आपले वर्चस्व निर्माण करून आ. मंगेश चव्हाण यांना शह दिला. तालुक्यात या शिक्षण संस्थेच्या ४० शाखा असून सुमारे एक हजार ११५० कर्मचारी संस्थेत कार्यरत आहेत. यापुढे खा. उन्मेष पाटलांनी या शिक्षण संस्थेतील नेटवर्कचा निश्चित फायदा होणार आहे. त्यामुळे आगामी २०२४ च्या निवडणुकीत आ. चव्हाण आणि खा. उन्मेष पाटील यांच्यातील शीतयुद्ध रंगणार यात शंका नाही. कारण आता चाळीसगाव तालुक्यात जोरदार चर्चा सर्वत्र होत आहे. त्यामुळे आ. चव्हाण यांना यापुढे सावध भूमिका पार पाडावी लागेल. कारण आ. मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जी पैशांची घमेंड व्यक्त केली, त्यातून त्यांचा अहंकार जनतेला भावलेला नाही. हा अहंकार नडला.

दूध संघाच्या निवडणुकीत जिल्हाभरात फक्त ४४३ मतदार होते. त्यातच मतदारांना पाकीटे देऊन मते विकत घेण्याच्या बातम्या चव्हाट्यावर आल्या. भालोद मध्ये दूध सोसायटीच्या कार्यालयासमोरच सोसायटी संचालकांच्या हमरी तुम्ही हे उघड झाले. हे सर्व सिद्ध करणे अवघड असल्याने ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ या पद्धतीने त्यावर पडदा पडला असला तरी दूध संघाला पारदर्शक करून विकास साधणे हे चेअरमन म्हणून आ. मंगेश चव्हाण यांच्यासमोर फार मोठे आव्हान आहे. तसेच सहकार क्षेत्रातील एक मोठी संस्था ताब्यात घेण्याचे श्रेय आ. मंगेश चव्हाण घेत असले तरी त्यानंतर चोपडा शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या निवडणुकीत मात्र त्यांच्या पॅनलचा पूर्ण सफाया झाला, हे ध्यानात घेणे महत्त्वाचे आहे. एकंदरीत चाळीसगाव तालुक्यातील भाजपमध्ये सर्वच काही अलबेल नसल्याचे राष्ट्रीय शिक्षक संस्थेच्या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.