अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळासाठी रेल्वे प्रशासनाने स्पेशल बलसाड ते प्रयागराज रेल्वेगाडीची व्यवस्था केली आहे. या गाडीस अमळनेर स्थानकावर थांबा मिळाल्याने आपल्याकडील भाविकांची सोय झाली असल्याची माहिती खा. स्मिता उदय वाघ यांनी दिली.
सदर गाडीला अमळनेर स्थानकावर थांबा मिळण्यासाठी खासदार वाघ यांनी प्रयत्न केले होते. दिनांक 25 जानेवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान येऊन जाऊन 10 फेऱ्या या गाडीच्या होणार आहेत. बलसाड येथून प्रयाग जाण्यासाठी गाडी क्रमांक 09019 ही दिनांक 25 जानेवारी तसेच 8 फेब्रुवारी,15 फेब्रुवारी,19 फेब्रुवारी आणि 26 फेब्रुवारी अशी पाच दिवस धावणार असून अमळनेर येथे 1.10 वाजता आगमन होऊन 1.12 वाजता रवाना होणार आहे.
तर गाडी क्रमांक 09020 ही प्रयाग येथून दिनांक 26 जानेवारी तसेच 9 फेब्रुवारी,16 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी आदी पाच दिवशी 4.30 वाजता अमळनेर पोहोचून 4.32 ला रवाना होणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन खा. स्मिता वाघांनी केले आहे.