आगामी सामना आम्हीच जिंकणार !

संजय राऊतांची ठाण्यात राजकीय ‘फटाकेबाजी’

0

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

ठाण्यातील दोन सामने आम्ही हरलो, आता आगामी महापालिका निवडणुकीचा सामना आम्ही जिंकणारच, असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ठाण्यात व्यक्त केला. खारकर आळी येथे शिवसेना (उबाठा) आयोजित ‘हिंदुहदयसम्राट चषक’ क्रिकेट स्पर्धेला राऊत यांनी उपस्थिती नोंदवली. यावेळी पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी क्रिकेटपटूंना शुभेच्छा देताना राऊत यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली.

दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ’ हिंदुहदयसम्राट चषक’ क्रिकेट स्पर्धेचे गेल्या 13 वर्षापासून आयोजन केले जाते. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला खासदार संजय राऊत उपस्थित होते. यावेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ठाण्यातील जागांवर झालेल्या पराभवाबाबत राऊत यांनी भाष्य केले. या स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा राऊत यांनी आनंद लुटला. त्यांच्या यांच्या हस्ते विजेत्या संघाला 50 हजार रोख पारितोषिक आणि भव्य चषक देऊन गौरवण्यात आले. यावेळी माजी खासदार राजन विचारे, उपशहरप्रमुख व स्पर्धेचे आयोजक सचिन चव्हाण, उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील उपनेते विजय कदम, विभागप्रमुख प्रशांत सातपुते आदी उपस्थित होते.

‘ठाण्यातले चोर आम्ही मुंबईत पकडू’

अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसलेला हल्लेखोर ठाण्यात पकडला आहे. याबाबत टिप्पणी करताना आम्ही ठाण्यातले चोर मुंबईत पकडू, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. याप्रसंगी मुंबई येथे घडलेल्या बोट दुर्घटनेत अनेक नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या आरिफ बामणे आणि पाठलाग करून चोर पकडून देणाऱ्या शिवसेना शाखाप्रमुख चेतन चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.