लोकशाही संपादकीय लेख

शिवसेना उबाठा गटातून गद्दारी करून शिंदेसेनेस प्रवेश करणारे मुंबई ईशान्येचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. “माझ्या टिंबटिंबमध्ये बोट घालत असाल तर मी काही केल्या गप्प बसणार नाही. तुम्हाला मी मारून टाकीन. माझ्या नादी लागतील ते एकतर स्मशानात जातील अन्यथा हॉस्पिटलमध्ये जातील, हे लक्षात ठेवा आणि मी हे बोलतो आहे, ते पोलीस कमिशनरला ऐकवा किंवा त्यांना सांगा.. मी घाबरणार नाही.. मी अनेक लोकांचे मुडदे पाडले आहेत हे लक्षात ठेवा.. मी तुमच्या घरावर बॉम्ब टाकून उडवून देईल.. माझ्या नादी लागू नका..” हे शब्द आहेत खासदार संजय दिना पाटील यांचे. त्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्यामुळे त्यांना सत्ताधारी पक्षाने वाय प्लस सिक्युरिटी दिली आहे. सिक्युरिटीचे कवच कुंडल घेऊन ते पत्रकारांना मारण्याची धमकी देत आहेत. खासदार संजय दिना पाटील यांचे काय बिघडले होते? हे कळत नाही. ते उबाठा गटाचे उद्धव ठाकरे यांचे एकनिष्ठ खासदार होते. परंतु सत्ता बदल होताच त्यांची भाषाही बदलली. जे पत्रकार म्हणजेच माध्यमांचे प्रतिनिधी त्यांना शिवीगाळ करताना आपण खासदार आहोत हे विसरून जा… असे खुद्द पत्रकारांनाही ते म्हणाले आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणाऱ्या माध्यमांचे प्रतिनिधी त्यांना मारण्याची भाषा करू लागले. आपण शिवीगाळ करतो आहोत, मारून टाकण्याची धमकी देत आहोत यांचे भान सुद्धा त्यांना राहिले नाही. बेफाम पणे शिवीगाळ करून मारण्याची धमकी देत होते. बरे ते थांबतही नव्हते. एक सारखे बोलतच होते आणि तेही शिवराळ भाषेत.. पत्रकारांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आणि बॉम्बने घर उडवून देऊ, तसेच मी अनेकांचे मुडदे पाडले आहेत या त्यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्राचे पोलीस कमिशनर देवेन शास्त्री यांना खासदार संजय राऊत यांनी एक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, त्यांनी कोणाचे मुडदे पाडले आहेत? त्यांची यादी सादर करायची. तसेच एक सत्ताधारी पक्षातला खासदार बॉम्बने घर उडवून देण्याची भाषा करतो म्हणजे त्यांचे जवळ बॉम्ब आहेत. तर ते आले कुठून? याचा शोध घेणे आवश्यक आहे. भारताला पाकिस्तान या देशाजवळ बॉम्ब आहेत की नाही हे सांगता येत नाही.. पण यांचे जवळ पाहून बॉम्ब कुठून आला? आणि तो असेल तर ती बाब फार मोठी गंभीर आहे. त्यांचा तपास लागणे गरजेचे आहे. त्याचबरोबर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणवल्या जाणाऱ्या पत्रकारांना जर मारण्याची धमकी येत असेल तर ते लोकशाहीसाठी घातक आहे. त्यांचा शोध घेणे आवश्यक आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर संसदेत कायदे करणारे खासदार जर बॉमने घर उडवून देऊ अशी धमकी वजा भाषा करीत असतील तर ते अशोभनीय आहे. स्वतःला वाय प्लस सिक्युरिटी घेऊन त्या सिक्युरिटीच्या कवचकुंडलात बसून जर कोणी मारण्याची धमकी देत असेल तर तो सिक्युरिटीचाच अपमान आहे. याबाबत महसूल मंत्री बावनकुळे यांनी म्हटले आहे, स्वतःकडे सिक्युरिटी असताना पत्रकारांना मारून टाकण्याची धमकी देणे हे अशोभनीय आहे. याबाबत योग्य ती माहिती घेऊन त्याबाबतीत संजय दिना पाटील यांना जाब विचारण्यात येईल. याबाबत संजय दिना पाटील यांची मग्रुरी वाढली ती केवळ सत्ताधारी पक्षात गेल्यामुळेच होय.. आणि त्यांना मिळालेली सिक्युरिटी हेच होय.. याबाबतीत त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. तरच अशा लोकांना जरब बसेल.. कारण खासदार म्हणून घेण्याची त्यांची लायकी नाही. त्यांना त्यांच्या मतदारसंघातील मतदार जाब विचारतील, “आम्ही तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे म्हणून मतदान केले, तेव्हा तुम्ही तो पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात कसे गेले? त्याचा आम्हाला जाब द्या..” तेव्हा संजय दिना पाटील काय जाब देतील? हे त्यांनाच माहिती..
सध्या सत्ताधारी पक्षात जाणाऱ्या लोकप्रतिनिधींची जणू रीघ लागली आहे. कारण काय तर विकासासाठी आम्हाला निधी मिळत नाही.. परंतु जो खासदार निधी त्यांना कायदेशीर रित्या मिळतो तो निधीही सर्व खासदारांनी वापरलेला नाही. म्हणजे निधी अपुरी मिळतो हे त्यांचे म्हणणे मान्य नाही. कारण जो निधी मिळाला त्यातील संपूर्ण निधी त्यांनी वापरलेला नाही. त्यामुळे अपुरा निधी मिळाला हे त्यांचे म्हणणे योग्य नाही. हे केवळ स्वार्थासाठी आहे. निव्वळ स्वार्थासाठीच त्यांनी पक्ष बदलला आहे. कुणाला 50 कोटी दिले तर कुणाला शंभर कोटी.. तर कुणाला मंत्रीपदाचे अमिष दाखवण्यात आले आहे. त्यामुळे विकास निधी मिळत नाही हे त्यांचे म्हणणे साफ चुकीचे आहे. आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी पक्ष बदल केलेला आहे. यात एकेक मतदार समोर येऊन बोलू लागला आहे. तुम्ही आमची दिशाभूल करून तुमचा प्रक्ष प्रवेश स्वार्थासाठी केला आहे. तुम्हाला मतदारसंघात फिरणे आम्ही मुश्किल करून टाकू. त्याचबरोबर येत्या निवडणुकीत तुम्ही खासदार म्हणून कसे निवडून येतात? ते पाहू. आमचे मत वाया गेले तरी चालेल पण आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही. तुम्हाला हाणून पडू.. एकंदरीत मतदार संघातल्या मतदारात तीव्र असंतोष पसरलेला आहे. त्यातच उबाठा नेते उद्धव ठाकरे हे उद्यापासून या गद्दार खासदारांच्या मतदार संघात दौरा करून कार्यकर्त्यांशी हितगुज साधणार आहेत. परंतु मतदार इतका चिडला आहे की त्यांने त्यांच्या मतदारसंघात फिरणे कठीण होईल. धाराशिवचे गद्दार खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. पण ते देखील निधी, मंत्रीपद आणि खोके यांच्या नादी लागून ‘प्रवेशकर्ते’ झाले. त्यांच्या मतदारसंघातील शेकापचे भाई उद्धवराव पाटील यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. यशवंतराव चव्हाण दिल्लीत संरक्षण मंत्री म्हणून गेल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. परंतु त्यांनी ती ऑफर धुडकावली आणि म्हणाले मी तुमच्या ऑफरला नाकारतो. मी माझ्या तत्त्वाशी एकनिष्ठ आहे. माझा मृतदेह हा लाल पावट्यातच जाईल… कुठे भाई उद्धव पाटील आणि कुठे हे गद्दार खासदार..!


