खासदार दुबेंची मुक्ताफळे भाजपला महागात पडणार..!

0

 

लोकशाही संपादकीय लेख 

मुंबई महापालिका निवडणुकीआधी मुंबईत मराठी अमराठी माणसांमध्ये सत्ताधारी महायुतीकडून वाद पेटवला जातोय. तथापि राज उद्धव ठाकरेंच्या मोर्चाच्या आधीच हिंदीची सक्ती करणारा जी.आर. महाराष्ट्र शासनाने रद्द केला. मराठी माणसाकडून पहिला धक्का महायुती सरकारला बसला. त्यानंतर आज मराठी माणसांच्या संरक्षणासाठी मीरा-भाईंदर येथे काढण्यात आलेल्या मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असताना भव्य मोर्चा निघाला. हा दुसरा धक्का मराठी माणसांच्या वतीने महायुती सरकारला देण्यात आला. इतकेच नव्हे तर अविनाश जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मोर्चाच्या पूर्वसंध्येलाच केलेली स्थानबद्धता रद्द करून त्यांना सोडून देण्यात आले. एक प्रकारे महायुती सरकार अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा माघार घ्यावी लागली. मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी मराठी अमराठी वादाची ठिणगी टाकून काय होते, हे महायुतीने अर्थात भाजपने आजमावून घेतले. त्यातच भाजपचे बिहारचे खासदार निशिकांत दुबे यांनी मुंबईतील मराठी माणूस अमराठी माणसांमुळे जिवंत आहे, अन्यथा मुंबई मध्ये मराठी माणसाला विचारतो कोण? असा सवाल करून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना “गली मे कुत्ता भी शेर होता है..” असे संबोधून त्यांना मुंबई सोडून बिहारमध्ये यावे त्यांना आपटून आपटून मारले जाईल, असा इशारा दिला. खासदार निशिकांत दुबे यांच्या या मुक्ताफळांमुळे मराठी माणसांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचली आहे. परंतु मराठी माणसाला जर कोणी आव्हान दिले तर तो त्या विरोधात फणा काढणारच. मीरा-भाईंदरचा आजचा मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मोर्चाने हे सिद्ध केले आहे. मुंबई पोलिसांनी पहिल्यांदा मोर्चालाच परवानगी नाकारली. मोर्चेकरांचा दबाव वाढताच मोर्चाच्या रस्त्यांमध्ये बदल करून परवानगी दिली. तथापि मोर्चा मूळ ठरलेल्या मार्गानेच निघाला आणि तो इतका भव्य होता, की त्याने सर्वांचे लक्ष वेधले. मोर्चाला परवानगी नाकारल्यावरच तसेच मोर्चाच्या आदल्या दिवशी घरात घुसून मनसे तसेच उबाठा कार्यकर्त्यांना धरपकड करून अटक केल्याबद्दल सत्ताधारी पक्षात वाद निर्माण झाले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यात आणि पोलिसांमध्ये यावरून वाद निर्माण झाले. तरीसुद्धा मराठी विषयी पुळका दाखविणाऱ्या सरनाईकांना मोर्चेकर्‍यांनी सळोकी पळो केले. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या बंधूंच्या झालेल्या युतीनंतर महाराष्ट्र सरकार बॅक फुटवर गेले आहे. भाषेच्या वादावरून कुणी गुंडगिरी करीत असेल तर अशा गुंडगिरीवर कारवाई केली जाईल, असे म्हणणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बॅकफुटवर गेले आहेत. अविनाश जाधवांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर मोर्चा आधीच त्यांना सोडून देण्यात आले हे कशाचे देवतक आहे?

महाराष्ट्राचा सन्मान म्हणजेच मराठीचा सन्मान होय, परंतु मराठी माणसाची तुलना पहलगाम येथील भाविकांवर झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यांशी करून सांस्कृतिक मंत्री अविनाश शेलार तोंडावर पडले. मराठी माणसाची अतिरेक्यांशी तुलना करून नंतर माफी मागितली. आज खासदार निशिकांत दुबेने मराठी माणसांवर वाहिलेल्या मुक्ताफळाशी महायुती सरकार सहमत नाही, अथवा भाजप सहमत नाही, असे वक्तव्य करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. विधानसभा अधिवेशनातील दोन्ही सभागृहात निशिकांत दुबेच्या वक्तव्याविषयी मोठा राडा होऊन विरोधी पक्षाबरोबर सत्ताधारी पक्षाने त्या वक्तव्याचा निषेध केला. त्या वक्तव्याशी सत्ताधारी सहमत नाही, अशी मखलाशी अखेर त्यांना करावी लागली. खासदार निशिकांत दुबे सारख्या वाचाळ वीरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी वेळीच आवर घालणे गरजेचे आहे, अन्यथा हे बुमरँग त्यांच्यावरच उलटणार यात काही शंका नाही. मराठी माणसाचे समर्थन करणारे खासदार निशिकांत दुबे हे मुस्लिमांच्या विरोधात वक्तव्य करतात, हे कसले अमराठी माणसा विरोधात प्रेम? एकंदरीत राज ठाकरे उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू वीस वर्षानंतर एकत्र आले काय? त्यांच्यात हिंदी सक्तीचा मुद्दा घेऊन त्यांनी विजय मिळवला काय? या सर्व बाबींचे टाइमिंग जमून आल्याने महायुती सरकारला हे महागात पडणार आहे. हिंदी सक्तीचा जीआर रद्द झाल्यानंतर राज उद्धवच्या झालेल्या ऐतिहासिक मेळाव्याने महाराष्ट्र दणाणला. तर मीरा-भाईंदरच्या मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर जो भव्य मोर्चा निघाला, त्यामुळे महायुती सरकार बॅकफूटवर गेले आहे. आता मीरा-भाईंदरच्या मोर्चाला पोलीस प्रमुखांनी परवानगी नाकारल्याने त्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अहवाल मागवला आहे. परंतु मराठीच्या मुद्द्यावरून राज आणि उद्धव यांचा दोनदा विजय झाला एवढे मात्र निश्चित…!

Leave A Reply

Your email address will not be published.