मोरगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित विधेयक क्रमांक 40, 41, 42, 43, व 44 या विधेयकामधील कृषी केंद्र संचालकांविषयी केलेल्या जाचक नियमांना विरोध करण्यासाठी प्रस्तावित पाचही कायदे रद्द करण्यासाठी माफदा या संघटनेचे राज्याध्यक्ष विनोद भाऊ तराळ तसेच रावेर तालुका अध्यक्ष सुनील भाऊ कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 2 नोव्हेंबर पासून 4 नोव्हेंबर पर्यंत तीन दिवसांचा कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे. सदरचा बंद यशस्वी करण्यासाठी आज कृषी उत्पन्न बाजार समिती रावेर येथे रावेर तालुका ऍग्रो डीलर्स असोसिएशन ची बैठक संपन्न झाली.
या बैठकीला रावेर तालुक्यातून सर्व कृषी संचालक उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना सुनील भाऊ कोंडे यांनी संपूर्ण तालुक्यातील कृषी केंद्र धारकांना बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले व कडकडीत बंद ठेवावा अशा सूचना वजा विनंती केली. तसेच यावेळी सुनील भाऊ यांनी कृषी केंद्र धारकांकडे असणाऱ्या बियाण्यांच्या तसेच खतांच्या खाली पिशव्या (गोण्या) सोबत आणण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे या खाली खताच्या गोण्या बऱ्याच कृषी केंद्र संचालकांनी आणलेल्या होत्या. या गोण्या रावेर तालुका कृषी कार्यालय येथे जमा करून संबंधित गोण्यांपासून सातपुडा पर्वत रांगेत वन वनराई बंधाऱ्यांचे काम करण्यासाठी उपयोग होईल. शासन जरी आमच्या विरोधात कृषी कायदे जाचक नियम करून करत असतील तरीसुद्धा आम्ही पाणी आडवा पाणी जिरवा या शासनाच्या योजनेमध्ये छोटासा का होईना पिशव्या व गोण्या देऊन खारीचा वाटा उचलत राहू अशी चर्चा जमलेल्या कृषी केंद्र धारकांमध्ये सुरू होती. यावेळी उपस्थितांमध्ये सुनील भाऊ कुलकर्णी, डॉ. जी .एम. बोंडे, भगवान महाजन, राहुल गुरुजी, सुनील पाटील, एकनाथ महाजन, युवराज महाजन, एकनाथ पाटील जितेंद्र महाजन व तालुक्यातील सर्व कृषी केंद्र धारक उपस्थित होते.