जळगाव

उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना पुढील आठवडा उष्णता, उकाडा आणि पावसाच्या प्रतीक्षेत काढावा लागण्याची चिन्हे आहेत. नाशिक वगळता जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत ८ जूनपासून हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता असून तापमानाचा पारा पुन्हा ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान अभ्यासक निलेश गोरे यांनी व्यक्त केला आहे.
त्यांच्या विश्लेषणानुसार, वातावरणात सुरुवातीला काही प्रमाणात ओलावा टिकून राहणार असला तरी पुढील काही दिवसांत उत्तर-पश्चिमेकडून कोरड्या हवेचे प्रवाह सक्रिय होण्याची शक्यता आहे. विशेषतः ९ ते ११ जूनदरम्यान या परिस्थितीचा प्रभाव अधिक जाणवू शकतो. त्यामुळे उष्णतेसोबतच दमटपणाही वाढण्याची शक्यता असून प्रत्यक्ष जाणवणारे तापमान अधिक राहू शकते.
काही दिवस आकाश अंशतः ढगाळ
पुढील काही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मात्र ढग दिसत असले तरी पाऊस पडेलच असे नाही. वातावरणाच्या मध्यम स्तरांमध्ये कोरडेपणा निर्माण झाल्यास ढगांची उंच वाढ थांबते आणि पर्जन्य प्रक्रिया कमकुवत होते. परिणामी अनेक भागांत ढगाळ वातावरण असूनही पाऊस पडणार नाही, तर उकाडा कायम राहील. मान्सूनपूर्व काळात अशी परिस्थिती वारंवार दिसून येत असल्याचे निलेश गोरे यांनी सांगितले.
दक्षिण भारतात मान्सूनची प्रगती सुरू असून तो आता मध्य भारताच्या दिशेने सरकत आहे. मात्र उत्तर महाराष्ट्रावर अधूनमधून प्रभाव टाकणाऱ्या कोरड्या हवेच्या पट्ट्यांमुळे मान्सूनच्या पुढील प्रवासाचा वेग काहीसा मंदावण्याची शक्यता आहे. सध्याच्या अंदाजानुसार जळगाव जिल्ह्यात १६ ते २१ जूनदरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता अधिक आहे. मोठ्या विलंबाचे संकेत नसले तरी काही दिवसांचा फरक पडू शकतो.
नुकताच झालेला पाऊस हा मान्सूनची चाहूल देणारा असला तरी तो स्थिर आणि सातत्यपूर्ण मान्सूनचा भाग मानता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीचे निर्णय घाईघाईने घेऊ नयेत, असा सल्ला हवामान अभ्यासक निलेश गोरे यांनी दिला आहे. १५ जूननंतर पावसाच्या सातत्याबाबत अधिक स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता असल्याने त्यानंतरचा कालावधी शेतीसाठी अधिक महत्त्वाचा ठरणार आहे.
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेची परीक्षा
एकूणच, पुढील आठवडा उत्तर महाराष्ट्रासाठी उष्णता, दमट वातावरण आणि पावसाच्या प्रतीक्षेचा ठरणार असून नागरिकांसह शेतकऱ्यांच्या सहनशीलतेची परीक्षा पाहणारा ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालपर्यंत पसरलेल्या ढगांच्या पट्ट्याने व गडगडाटी वादळांच्या मालिकेने देशाच्या हवामान नकाशावर एक स्पष्ट विभाजन रेखाटले आहे. या परिस्थितीमुळे मान्सून पोहोचलेले प्रदेश, मान्सूनपूर्व वातावरण असलेले भाग आणि अद्याप कोरड्या हवेच्या प्रभावाखाली असलेले प्रदेश असे तीन वेगवेगळे हवामान विभाग स्पष्टपणे दिसून येत असल्याचे भुसावळ येथील वेलनेस काऊन्सिलिंग सेंटरचे हवामान अभ्यासक श्री निलेश गोरे यांनी सांगितले.
या कारणामुळे मान्सूनला येतोय अडथळा
भुसावळ येथील हवामान अभ्यासक श्री निलेश गोरे यांनी सांगितले की, मध्य भारताच्या दिशेने वाहणारा कोरड्या हवेचा प्रबळ प्रवाह सध्या नैऋत्य मान्सूनच्या पुढील प्रगतीस अडथळा निर्माण करत आहे. त्यामुळे मान्सूनचा वेग काहीसा मंदावलेला असून त्याची उत्तरेकडे वाटचाल अपेक्षेपेक्षा धीमी झाली आहे. मान्सूनच्या दमदार वाऱ्यांनी या कोरड्या हवेचा प्रभाव कमी केल्यानंतरच मान्सूनला मध्य भारतात पुढे सरकणे शक्य होणार आहे. सध्याच्या स्थितीनुसार, २१ जूननंतर मान्सूनच्या मध्य भारतातील प्रगतीस अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. उपग्रह चित्रांमध्ये नारिंगी रंगाने दर्शविलेला किंवा लाल रेषेने अधोरेखित केलेला पट्टा हा मान्सूनच्या प्रगतीसमोरील प्रमुख अडथळा ठरत असल्याचे दिसून येते. या प्रभावक्षेत्रात उत्तर महाराष्ट्राचाही समावेश होत असल्याने येथे मान्सूनच्या आगमनास काही प्रमाणात विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


