लोकशाही न्यूज नेटवर्क
एकीकडे वाढती लोकसंख्या, दुसरीकडे गुन्हेगारीचे बदलते स्वरूप, त्यात सायबर गुन्ह्यांचे आव्हान, वाहतूक नियंत्रण, व्हीआयपी बंदोबस्त, सण-उत्सवांची सुरक्षा आणि न्यायालयीन प्रक्रियेचा वाढता व्याप, या सगळ्या आघाड्यांवर महाराष्ट्र पोलिस दल झुंजत असताना याच दलाच्या मनुष्यबळावर मात्र रिक्त पदांचे सावट कायम आहे.
मंजूर 2 लाख 25 हजार 461 पदांपैकी तब्बल 23 हजार 320 पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच मंजूर मनुष्यबळाच्या 10.35 टक्के पदांवर पोलिस उपलब्ध नाहीत. 30 जून 2026 अखेर राज्य पोलिस दलात 2 लाख 2 हजार 141 अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. सर्वाधिक तूट पोलिस शिपाई संवर्गात असून, मंजूर 1 लाख 26 हजार 409 पदांपैकी 1 लाख 10 हजार 193 पदे भरलेली आहेत. तब्बल 16 हजार 516 पदे रिक्त आहेत.
पोलिस ठाण्याचा प्रत्यक्ष भार सांभाळणाऱ्या या स्तरावरच एवढी मोठी तूट असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढत आहे. गस्त, बंदोबस्त, तक्रारींची नोंद, आरोपींचा शोध, न्यायालयीन कामकाज आणि तपास अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर येतात. पोलिस उपनिरीक्षक संवर्गातील 11,884 मंजूर पदांपैकी 2,878 पदे रिक्त आहेत. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकांच्या 20,991 पदांपैकी 1,562 पदे रिक्त आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या 4,791 पदांपैकी 287, तर पोलिस निरीक्षकांच्या 4,253 पदांपैकी 521 पदे रिक्त आहेत. एकच तपास अधिकाऱ्याकडे एकाच वेळी अनेक गुन्ह्यांचा तपास, आरोपींचा शोध, पंचनामे, कागदपत्रांची पूर्ततेची जबाबदारी येत असल्याने तपासाच्या गतीवर होऊ शकतो.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची लोकसंख्या, क्षेत्रफळ, गुन्ह्यांची संख्या आणि उपलब्ध पोलिस मनुष्यबळ यांचा एकत्रित विचार केल्याशिवाय महाराष्ट्र पोलिस दलाची खरी गरज स्पष्ट होणार नाही. त्यामुळे ‘एक पोलिस : किती नागरिक?’ या प्रश्नाचे जिल्हानिहाय उत्तर शोधून त्यानुसार पोलिस दलाची पुनर्रचना करण्याची वेळ आली आहे. पोलिस अधीक्षक ते पोलिस महासंचालक संवर्गातील 454 मंजूर पदांपैकी 30 पदे रिक्त आहेत. पोलिस उपअधिक्षक संवर्गातील 972 मंजूर पदांपैकी 185 पदे रिक्त आहेत. त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता केवळ तळाच्या स्तरावर नसून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संवर्गातही कायम असल्याचे दिसते.
राज्य शासनाने 2025 मध्ये पोलिस व कारागृह विभागातील विविध संवर्गातील 17,639 रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली होती. यात 12,399 पोलिस शिपाई, 234 पोलिस शिपाई चालक, 25 बँडस्मन, 2,313 सशस्त्र पोलिस शिपाई आणि 60 कारागृह शिपाई पदांचा समावेश होता. मात्र, भरतीनंतरही निवृत्ती, पदोन्नती आणि इतर कारणांमुळे रिक्त पदांची संख्या पुन्हा वाढत असल्याचे चित्र आहे.
आकडे बोलतात…
- 2 लाख 25 हजार 461 : मंजूर पदे
- 2 लाख 02 हजार 141 : कार्यरत अधिकारी-कर्मचारी
- 23 हजार 320 : रिक्त पदे
- 16 हजार 516 : रिक्त पोलिस शिपाई
- 2 हजार 878 : रिक्त पोलिस उपनिरीक्षक
- 1 हजार 562 : रिक्त सहाय्यक पो. उपनिरीक्षक
- 521 : रिक्त पोलिस निरीक्षक

