लखपती दीदी संमेलनात महिलांच्या सुरक्षेवर पंतप्रधान मोदींचा कटाक्ष..!

0

 

लोकशाही संपादकीय लेख 

देशातील लखपती महिलांच्या योजनेचा शुभारंभ काल जळगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत ‘लखपती महिला संमेलन’ घेऊन पार पडला. देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच जळगाव जिल्हा भरातून सुमारे दीड लाख महिलांचा जनसागर या संमेलनास लाभला होता. आतापर्यंतच्या उपस्थितीचे रेकॉर्ड कालच्या महिला उपस्थितीने तोडल्याचे पंतप्रधानांपासून सर्वच राजकीय नेत्यांनी मान्य केले. देशातील इतर राज्यातून महिला लखपती महिला संमेलनास उपस्थित होत्या. प्रातिनिधिक स्वरूपात काही लखपती महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. नारीशक्तीच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक केले. यापुढे देशाचे नेतृत्व हे नारीशक्तीच्या हाती राहील, असाही उल्लेख मोदींनी केला.

 

महिलांच्या कार्याचा गौरव करीत असताना सध्या महिलांवर होत असलेल्या अत्याचाराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांभीर्य व्यक्त केले. सध्याच्या महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील नामांकित शाळेतील दोन बालिकांवर झालेल्या अत्याचार प्रकरणी महाराष्ट्रभर होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तसेच देशात वाढत असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत सर्वच राज्यांना गांभीर्याने घेण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या. महिलांवर होत असलेल्या अत्याचारातील अपराधी तसेच त्याला पाठीशी घालणारे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी त्यातून कोणीही सुटता कामा नये. महिलांवर अत्याचार करणे हा फार मोठा अपराध असून तो अक्षम्य असा गुन्हा आहे. त्यासाठी महिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करताच त्याबाबत तातडीने एफआयआर दाखल झाली पाहिजे. त्यासाठी पीडित महिलांना एफआयआर दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेच पाहिजे असे नाही. त्या घरी बसूनही ‘ई एफआयआर’ सुद्धा दाखल करू शकतात. ई एफआयआरची तातडीने दाखल करून पोलिसांतर्फे त्याची तातडीने चौकशी केली गेली पाहिजे. तशा सूचना सर्वच राज्यांना केंद्रातर्फे देण्यात येतील. दोषी सिद्ध झालेल्या अपराध्यास फाशीची शिक्षा किंवा जन्मठेपेची शिक्षा फास्टट्रॅक न्यायालयामार्फत सुचव सुनावण्यात आली पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. आपल्या अर्धा तासापेक्षा जास्तच्या भाषणातील निम्म्यापेक्षा जास्त वेळ त्यांनी महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात खर्ची घातला.

 

येत्या तीन महिन्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आहेत. लखपती दिदी संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे जणू रणशिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुंकले आहे. त्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याने महिलांसाठी विविध योजना राबवित असल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे कौतुक केले. महायुतीचे प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या महिलांसाठी राबवित असलेल्या योजनांचे कौतुक केले. सध्या महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना राबवित असताना बदलापूर घटनेने जे आंदोलन होते आहे, त्याचा फायदा विरोधकांना मिळू नये, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांवरील अत्याचाराची गांभीर्याने दखल घेण्यासंदर्भात महाराष्ट्रसह इतर राज्यांना सूचना दिल्या. ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे आहे. कारण महिला सुरक्षेच्या संदर्भात गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठ्या गांभीर्याने दखल घेऊन कडक कायद्याद्वारे अंमलबजावणी करण्याचे संकेत दिले आहेत. यापूर्वी ऑलम्पिक स्तरावर पदक पटकविणारा महिला कुस्तीपटूंनी त्यांचे विनयभंग झाल्याबद्दल एका केंद्रीय मंत्र्याच्या विरोधात उपोषण आंदोलन केले. तेव्हा त्या महिला कुस्तीपटूंची केंद्राने दखल घेतली नव्हती. ‘विनयभंग करणाऱ्या मंत्र्यांनी माफी मागावी’, अशी त्या महिला कुस्तीपटूंची मागणी सुद्धा फेटाळून लावली होती. तेव्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाराबाबत निषेदाचे आंदोलन महाराष्ट्रात सुरू झाल्याने किमान महिलांवरील अत्याचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले, ही चांगली गोष्ट म्हणता येईल.

 

इतकेच नव्हे तर महिलांवर अत्याचार करणाऱ्या अपराधी तसेच त्या अपराध्यास पाठीशी घालणारे कोणीही असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे मोदींनी आदेश दिले. बदलापूर येथील नामांकित शाळेत झालेल्या बालिकांवरील अत्याचारात ही शिक्षण संस्था भाजपशी निगडित असल्याचे बोलले जाते. त्या शाळेवर कारवाई होणार नाही, अशी अनेकांना शंका वाटते. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी दिलेले कडक कारवाईचे आदेश महत्त्वाचे आहेत. कालच्या लखपती दीदी महिला संमेलनात महिलांच्या उन्नती संदर्भात तसेच त्यांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात केलेल्या ३५ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे संकेत दिले असले, तरी विरोधी एकाही नेत्याचे नाव त्यांनी घेतले नाही, हे विशेष होय. कारण लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या नेत्यांवर केलेल्या टिके मुळे त्यांचे काय पडसाद उमटले, याची जाणीव त्यांना झालेली दिसते आहे. या निमित्ताने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला, आणि त्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली, हे विशेष होय…!

Leave A Reply

Your email address will not be published.