देशभरातील २१ लाख फसवे मोबाईल क्रमांक बंद
डिजिटल फसवणुकीवर ट्रायची धडक कारवाई
पुणे वृत्तसंस्था : देशभरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या डिजिटल, टेलिकॉम आणि आर्थिक फसवणुकीला आळा बसावा यासाठी दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) आतापर्यंतची सर्वात मोठी आणि व्यापक मोहीम राबवत २१ लाखांहून अधिक फसवे मोबाईल क्रमांक निष्क्रिय केले आहेत.
याशिवाय, चुकीच्या केवायसीच्या आधारावर व्यवहार करणाऱ्या, स्पॅम कॉल्स–फसवे संदेश पाठवणाऱ्या, ओटीपी चोरी आणि आर्थिक फसवणुकीत सामील असलेल्या सुमारे एक लाख संस्थांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.
भारतामध्ये इंटरनेटचा वापर आणि डिजिटल पेमेंट्स झपाट्याने वाढत असले तरी सायबर सुरक्षेबाबत जागरूकता कमी असल्याने गुन्हेगारांना कमी दक्षता घेणाऱ्या नागरिकांना फसवणे सोपे जाते. फेक अॅप्स, सोशल इंजिनीअरिंग, प्रलोभनात्मक कर्ज प्रस्ताव, फिशिंग कॉल्स, व्हॉट्सअॅप मेसेजिंग गट, तसेच बनावट डिजिटल सेवा पुरवठादार अशा विविध पद्धतींनी फसवणूक करणाऱ्यांचे जाळे देशभर पसरले आहे.
ट्रायच्या तपासात अनेक बनावट मार्केटिंग एजन्सीज, डिजिटल प्रमोशन कंपन्या, फिशिंग नेटवर्क्स आणि ओटीपी चोरी करणारे गट मोठ्या प्रमाणात लोकांना फसवत असल्याचे आढळले. काही संशयास्पद संस्थांकडे एकाच नावावर अत्याधिक सिमकार्ड घेऊन त्याद्वारे संशयास्पद व्यवहार होत असल्याचेही उघड झाले.
या कारवाईनंतर देशातील लाखो नागरिकांना सतत त्रास देणाऱ्या स्पॅम कॉल्स, प्रमोशनल फसवे मेसेज, आणि आर्थिक फसवणुकीच्या प्रयत्नांपासून मोठा दिलासा मिळणार आहे.
ट्रायकडून पुढील काळातही अशाच कडक तपास आणि निर्भीड कारवाया होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.