विद्यार्थिनीचा मोबाईल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावला
जळगाव शहरातील प्रभात कॉलनी चॊकातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील प्रभात चौक परिसरात दिवसाढवळ्या मोबाईल हिसकावण्याची घटना घडली आहे. दि. १ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या अज्ञात चोरट्यांनी पायी जात असलेल्या विद्यार्थिनीच्या हातातून मोबाईल जबरीने हिसकावून नेल्याने परिसरात खळबळ उडाली.
एरंडोल येथील सानिका अमोल पाटील (वय २०) ही तरुणी शिक्षणासाठी जळगावात आली आहे. ती दुपारी एम. जे. कॉलेज परिसरातून बसस्थानकाच्या दिशेने जात असताना प्रभात चौकात मागून आलेल्या दुचाकीस्वारांनी तिच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनीने आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत चोरटे वेगाने पसार झाले होते.
यानंतर तिने तत्काळ जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पोहेकॉ मिलींद सोनवणे करत आहेत.
शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी चोरट्यांचा तातडीने शोध घेण्याची मागणी होत आहे.


