प्रचार संपताच मनसेमधील खदखद समोर

मिसळ पार्टीत खंत व्यक्त : नाराजी राज ठाकरेपर्यंत जाणार

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील खदखद आता समोर आली आहे. राज्यात पाच टप्प्यांमध्ये मतदान झाले. मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला. पण आता त्यांची खदखद बाहेर पडली आहे. नाशिकमधील कार्यकर्त्यांची खदखद कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघाचा समावेश पाचव्या टप्प्यात होता. 20 मे रोजी नाशिकमध्ये मतदान झाले. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मिसळ पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत कार्यकर्त्यांनी त्यांच्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली. महायुतीच्या उमेदवारांसाठी आम्ही पदरमोड करुन प्रचार केला. पण पदाधिकाऱ्यांनी आपल्याकडे लक्षच दिले नाही, अशी खंत कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. नाशिकमध्ये महायुतीकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे रिंगणात होते. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजे यांचे आव्हान होते. शिवसेनेचे खासदार असलेल्या गोडसेंचे तिकीट उशिरा जाहीर झाले. त्यांना भाजप, राष्ट्रवादीची प्रचारात फारशी साथ लाभली नसल्याचे बोलले जाते. पण मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे काम केले. विशेष म्हणजे गोडसे हे पूर्वी मनसेमध्येच होते. त्यांनी 2009 मध्ये मनसेकडूनच लोकसभा निवडणूक लढवली होती. अटीतटीच्या लढतीत त्यांचा पराभव झाला होता.

कार्यकर्त्यांचे लक्ष लागून

राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर नाशिकमधल्या मनसैनिकांनी गोडसेंच्या प्रचारात सहभाग घेतला. महायुतीमधील अन्य पक्ष प्रचारात नसताना मनसैनिक प्रचारात उतरले. पण पदरमोड करुनही पदाधिकाऱ्यांनी आपल्याकडे लक्ष दिलं नाही, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यांची तक्रार राज ठाकरेंकडे पोहोचवली जाणार आहे. ते काय निर्णय घेतात, याकडे आता कार्यकर्त्यांचे लक्ष लागलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.