आजचा संघर्ष हा तुमचा उद्याचा विजय असेल : आ. मंगेश चव्हाण

समृद्धी शिक्षक फाउंडेशनचा बक्षीस वितरण समारंभ

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

बलिकादिनानिमित्त व सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त तालुकास्तरावर चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन येथील समृद्धी शिक्षक फाउंडेशन तर्फे करण्यात आले होते, विविध शाळेतील 530 विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला. लहान, युवा व मोठ्या गटात ही स्पर्धा झाली. त्याचा बक्षीस वितरण व गुणगौरव समारंभ शेठ ना, बं, वाचनालयात मकर संक्रातीच्या शुभ मुहूर्तावर संपन्न झाला.

या स्पर्धेला विशेष उपस्थिती चाळीसगांवचे आमदार मंगेश चव्हाण यांची लाभली. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री, किरणकुमार कबाडी यांच्या अध्यक्षतेखाली गुणगौरव समारंभ पार पडला. यावेळी व्यासपीठावर सेवा सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे चिटणीस राजेंद्रजी राठोड, तसेच शिक्षण विभागातील केंद्र प्रमुख राजेंद्र पाटील, उमवीचे सिनेट सदस्य प्रा, सुनील निकम, समृद्धी शिक्षक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश सूर्यवंशी, संस्थापक सचिव चित्रकार दिनेश चव्हाण, कार्याध्यक्ष प्रा, चंद्रकांत ठाकरे उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षक्षीय भाषणात कबाडी म्हणाले की, स्पर्धेचे युग आहे, आपल्याला यात टिकण्यासाठी मेहनत घ्यावीच लागेल. यश हे सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी परिश्रम घ्यावेच लागतात. महापुरुषांचे विचार आत्मसात करा, त्यांना वाचा असे सांगताना काही अनुभव विशद केले.

चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण आपल्या भाषणातून म्हणाले की, प्रथम क्रमांकाने आपला क्रमांक कसा टिकवता येईल याची काळजी घ्यावी, व द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ क्रमांक मिळाल्यानी आपण प्रथम क्रमांकापर्यंत कसे पोहचू यासाठी प्रयत्न करावे, कुणी गरीब शिक्षणापासून वंचीत राहू नये यासाठी तुम्हाला शिक्षणासाठी मदत लागल्यास मी मोठा भाऊ म्हणून कधीही मदतीला उभा आहे असे सांगताना काही अनुभव सांगितले. शिक्षणाने माणूस समृद्ध होतो, समृद्धतेतून समृद्धीकडे वाटचाल होत असते म्हणून जीवनात स्पर्धेत उतरा, आजचा संघर्ष हा तुमचा उद्याचा विजय असेल, असे सांगून विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांना समृद्धी शिक्षक फाउंडेशन तर्फे चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांनी शब्दांकन केलेले मानपत्र देण्यात आले.

कार्यक्रमासाठी समृद्धी शिक्षक फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश सूर्यवंशी, सचिव चित्रकार दिनेश चव्हाण, कार्याध्यक्ष प्रा. चंद्रकांत ठाकरे, सहसचिव महेंद्र पवार, उपाध्यक्ष कामिनी पाटील, कोषाध्यक्ष प्रा, नितादेवी चव्हाण, संचालक जामराव पाटील, सोमनाथ चौधरी, दिनेश मोरे, चेतन कुऱ्हाडे, प्रवीण पवार यांचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक प्रा, चंद्रकांत ठाकरे यांनी तर स्पर्धेचे सूत्रसंचालन कामिनी पाटील व नीता चव्हाण यांनी केले. आभार दिनेश मोरे यांनी मानले. यावेळी पालकामधून व विद्यार्थ्यांमधून मनोगत व्यक्त झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.