तरुण तडफदार आमदार मंगेश चव्हाणांना शुभेच्छा !

0

लोकशाही संपादकीय लेख 

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे तरुण तडफदार आमदार मंगेश चव्हाण यांचा आज वाढदिवस. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजीव देशमुख यांचा पराभव करून विजय प्राप्त केला. गेल्या पाच वर्षाच्या आपल्या आमदारकीच्या काळात जिल्ह्यातील आमदारांमध्ये आमदार मंगेश चव्हाण यांनी सर्वाधिक चर्चेचा विषय बनून लक्ष वेधले. जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीचे स्वतंत्र पॅनल बनवून निवडणूक जिंकली. त्याची बक्षिसी म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांना संचालक मंडळांनी बिनविरोध चेअरमनपद बहाल केले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महायुतीची सत्ता आणून परिवर्तन केल्याचे श्रेय आमदार मंगेश चव्हाण यांना दिले जाते. शेतकऱ्यांशी निगडित असलेल्या दूध संघ व जिल्हा बँकावर महायुतीचे सर्वस्व सिद्ध केले. आपल्या पाच वर्षाच्या कालावधीत चाळीसगाव जिल्ह्यातील दुसरे आरटीओचे कार्यालय सुरू करून चाळीसगावहून जळगावला वाहनाच्या नोंदणीसाठी येण्याचा त्रास, वाहनधारकांचा वेळ व पैसा वाचवला. चाळीसगाव या तालुक्याच्या ठिकाणी भव्य अशी अद्ययावत प्रशासकीय इमारत उभी करून एकाच ठिकाणी सर्व सरकारी कार्यालये आणून चाळीसगाव तालुक्यातील जनतेची सोय केली.

जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या प्रशासकीय इमारतीला लाजवेल अशा प्रकारच्या प्रशस्त व अद्यावत इमारतीचे नुकतेच लोकार्पण झाले. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून निधी आणण्यात आमदार मंगेश चव्हाण यांचा हातखंड आहे. गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी त्यांचे स्वतःचे वाहन नसल्याने पायपीट करत जावे लागते. विद्यार्थ्यांचा वेळ आणि श्रम वाचवून अभ्यासासाठी त्यांना वेळ मिळावा म्हणून तालुक्यातील गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांची यादी काढून सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांना पाच वर्षात सायकलिंगचे मोफत वाटप केले. त्यासाठी स्वतःच्या खिशाला पैशाची कात्री लावून त्यांनी निधी उभा केला. गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण होणे महत्त्वाचे असल्याने त्यांना सायकली वाटप केल्या.

अलीकडे विविध व्यसनांमुळे तरुणाई वाया जात आहे. व्यसनावर उपाय म्हणून ३१ डिसेंबरला शुद्ध दुधाच्या पार्टीचे आयोजन करून तरुणांना दूध पाजणारा विराळाच आमदार म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे पाहिले जाते. मध्यम, वयस्कांसाठी तसेच जेष्ठ नागरिकांना अध्यात्माची गोडी वाढावी म्हणून चाळीसगाव ते पंढरपूर आषाढी एकादशीला दोन स्वतंत्र रेल्वेद्वारे पंढरपूरला पाठवून विठ्ठलाच्या दर्शनाचा मोफत लाभ मिळवून देण्याची आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रथाच पाडली आहे. स्वतः सपत्नीक ते या रेल्वेतील वारकऱ्यांसोबत जाऊन त्यांच्या फराळापासून ते जेवणापर्यंत तसेच पंढरीच्या विठुरायाचे व्यवस्थित दर्शन मिळवून देण्याची जातीने व्यवस्था करतात. ‘भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ’ अशी ओळख आपल्या कृतीने आमदार मंगेश चव्हाण यांनी निर्माण केली आहे. स्वतः ड्रायव्हरच्या वेषात ट्रक चालवून आरटीओचा भ्रष्टाचार उघडकीस आणला. तेव्हापासून ट्रक चालक त्यांना धन्यवाद देतात.

चाळीसगाव शहरात तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्याची कामे, पिण्याच्या पाण्याची योजना, तसेच गावातील स्मशानभूमी आणि समाज मंदिरे करण्यासाठी निधी मिळवण्यात ते अग्रेसर आहेत. बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मिळवण्यासाठी चाळीसगाव एमआयडीसीत नवे उद्योग आणण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. शहरातील बारमध्ये चालणाऱ्या अनधिकृत धंद्यांच्या बाबतीत स्वतः दहशत निर्माण करून पोलिसांच्या माध्यमातून असे अनधिकृत धंदे स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी बंद पाडले. एकंदरीत अवघ्या पाच वर्षाच्या आपल्या आमदारकीच्या काळात मतदार संघावर छाप पाडणाऱ्या जिल्ह्यातील आमदार म्हणून मंगेश चव्हाण यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. या तरुण आणि धडाडीच्या आमदाराकडे अजून मतदार संघात तसेच जिल्ह्यातील काम करण्याची अजून फार मोठी संधी उपलब्ध आहे. त्यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभो, हीच वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा…!

Leave A Reply

Your email address will not be published.