पारोळा तालुक्यातील भामरखेडा तलावासाठी २९ कोटी मंजूर..!

आ.चिमणराव पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

भामरखेडा तलावासाठी फार दिवसापासून लोकांची मागणी होती व माझे स्वप्न होते ते स्वप्न लवकरच पूर्णत्वास येईल. तलावासाठी २८ कोटी ६० लाख ६५ हजार मंजूर झाले असून लवकरच कामास सुरुवात होणार असल्याची माहिती आ. चिमणराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आ.पाटील पुढे म्हणाले, भामरखेडा तलावाची साठवण क्षमता १७७७.२१ स.घ.मी.असून नियोजित सिंचन क्षमता २६९ हेक्टर आहे.परिणामी २६९ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून मेहु तेहू, वाघरा-वाघरी, जोगलखेडे यासह परिसरातील गावांना योजनेचा लाभ होणार आहे. शेती आणि सिंचन या विषयांवर आपण भर दिला असून शेतकरी हितासाठी आपण मतदार संघातील जेथे जेथे पाणी अडवता येईल तेथे तेथे पाणी अडवून सिंचन क्षमता वाढविली आहे.

सिंचनासाठी अडीच वर्षात ६६ कोटी

सिंचनासाठी पारोळा एरंडोल भडगाव मतदार संघातील विविध ठिकाणी विविध कामे केली त्यातील बहुतांश कामे पूर्णत्वास येत आहेत तर उर्वरित कामे प्रस्तावित आहेत.शेती आणि शेतकरी हा महत्वाचा विषय आहे. शेतीसाठी पाणी अत्यावश्यक आहे. यासाठी आपण सिंचनावर भर देवून गेल्या अडीच वर्षात मतदार संघात सिंचनासाठी तब्बल ६६ कोटींचा निधी आणला असून काही कामे पूर्ण झाली तर काही कामे पूर्णत्वास येत असल्याचे आ. पाटील यांनी स्पष्ट केले.

नगरपालिकेत सत्ता द्या; २०० कोटी आणतो

नगरपालिकेत सत्ता नसतांना आपण शहरासाठी रस्ते, गटारी, चौक सुशोभीकरण, पाणी पुरवठा योजना यासह विविध विकास कामांसाठी भरघोस निधी आणून विकास साधण्याचा प्रयत्न केला असून नगरपालिकेत सत्ता दिल्यास शहराचा चौफेर विकास साधून कोणत्याही विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. २०० कोटींचा भरगोस निधी आणू असा आशावाद आ. पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी तालुका प्रमुख प्रा.आर बी पाटील, शहरप्रमुख अशोक मराठे, जेष्ठ संचालक चतुर भाऊसाहेब पाटील, राजू कासार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here