“चिमण आबा तुम्ही साहेबांच्या मागे राहा” (व्हिडीओ)

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात चाललेला सत्तांतराच्या नाट्यानंतर शिवसेनेतून बंडखोरी करून बाजूला झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने सध्या जोरदार संख्याबळ वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. अशातच जळगाव जिल्ह्यातील पारोळा एरंडोल मतदारसंघातील बंडखोर आमदार चिमणराव पाटील यांना जामनेर येथून एका शिवसैनिकाचा आलेला फोन सध्या जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे.

आ. चिमणराव पाटील यांना फोनवरून एका व्यक्तीने संपर्क साधत, मी तुमचा चाहता असून जामनेरचा शिवसैनिक आहे. मला माझ्या स्थानिक तालुक्यात शिवसैनिकांनी खूप त्रास दिला असून, आपण साहेबांच्या (उद्धव ठाकरे यांच्या) मागे रहावे, अशी माझी इच्छा आहे, असे सांगितले. दरम्यान आमदार चिमण पाटील यांनी देखील या शिवसैनिकाच्या वक्तव्याला दुजोरा देत आपण सत्तेत असूनही आपल्याला स्थानिकांनीच, त्यातल्या त्यात गुलाबराव पाटील यांनी प्रचंड त्रास दिला असल्याचे सांगितले.

युट्युब लिंक👇

यावेळी फोनवर आ. चिमणराव पाटील म्हणाले, मला खूप त्रास देण्यात आला असून मी त्यांना सांगून सांगून कंटाळलो आहे. माझ्याकडे ते लक्ष देत नव्हते. मी भिकाऱ्यासारखा यांच्या मागे फिरत होतो. माझ्याच मतदारसंघात येऊन कार्यक्रम करत होते, मात्र माझी दाखल घेत नव्हते. एकानेही माझ्याकडे लक्ष दिले नाही. मी शिवसेनेत राहूनही माझ्यासाठी बिकट परिस्थिती निर्माण केली. मी स्वतः उद्धव साहेबांना भेटून मला खूप त्रास होत असल्याबद्दल सांगितलं आहे. तरी काही झाले नाही. मला 2014 च्या निवडणुकीत पाडले. त्यांना (गुलाबराव पाटील यांना) मात्र मंत्री केले. आणखी किती दिवस सहन करायचं? आता मरायचे का? असा सवाल देखील त्यांनी फोनवर आपल्या भावना व्यक्त करतांना केला.

फोनवरील शिवसैनिकाकडून, ‘पुढे कसे होईल?’ याबाबत विचारणा केली असता, आ. चिमणराव पाटील यांनी सांगितले की, जे होईल ते होईल.. जर मला न्याय मिळत नव्हता तर काय करणार..! मला मी केलेला कामाचा फळ मिळालं नसतं तरी चाललं असतं. मला मंत्रीपदाशी काही एक घेणेदेणे नाही. मात्र मला रोज रोज त्रास दिला जात होता. खरं वागूनही मला त्रास दिला, याचे फार वाईट वाटते. मी प्रत्यक्ष उद्धव साहेब ठाकरे यांना देखील सांगितले की, 29 वर्ष झाले मी शिवसेनेत आहे. माझी एक तरी चूक दाखवून द्या. कार्यकर्तेच यात पिळले जात होते, असे ते म्हणाले.

दरम्यान पुढे बोलतांना ते म्हणाले, एवढेच नाही तर, पोलिसांकडे, इतर अधिकाऱ्यांकडेही आमच्या विरोधात फोन केले जायचे. ज्या माणसाला एवढे मंत्रीपद दिले तो माणूस फुटेल असे वाटले नव्हते. दहा जन्मात सुद्धा उद्धव ठाकरे यांचे उपकार यांना फेडता आले नसते. मी उद्धव ठाकरे यांना हे देखील सांगितले की, “मी शिवसेनेत राहू नये अशी यांची इच्छा दिसते. त्यासाठी हे सर्व चालू आहे. यांना माझी अडचण वाटत असावी. चिमण आबा हुशार आहे, त्यामुळे काय होईल सांगता येत नाही, अशी भीती त्यांना असावी. पण हुशार असणं हा काही गुन्हा नाही,” अश्या शब्दात त्यांनी मन मोकळे केले.

दरम्यान फोनवर बोलणाऱ्या शिवसैनिकाने सांगितले की, ‘तुमच्यावर फार अन्याय झालेला आहे, आणि हे अन्याय करणारे सर्व आता एकत्रित जमले आहेत. त्या ठिकाणी तुमच्यावर देखील अन्याय होणार आहे. तुम्हाला देखील त्या ठिकाणी त्रास दिला जाईल. अशा प्रकारात त्यांनी तुम्हाला ‘ना इकडचे, ना तीकडचे’ असे करून ठेवले आहे.

यावर उत्तर देतांना आ. पाटील म्हणाले, “हे माझ्याशी बोलत सुद्धा नव्हते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही मला फार त्रास दिला गेला. यांच्याशी आता आणखी किती दिवस लढणार? मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील याबाबत कल्पना दिली आहे. आणि याच अन्यायाच्या कारणामुळे मी तुमच्याकडे येत आहे, असे देखील सांगितले आहे. मी आता यांच्यासोबत नाही राहू शकत. मला फार त्रास झालेला आहे.”

संभाषणा दरम्यान फोनवर असलेल्या शिवसैनिकाने चिमणराव पाटील यांना, ‘तुमच्यावर झालेला अन्याय पाहता तुम्ही उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देऊन कायम त्यांच्यासोबत राहावे,’ अशी इच्छा व्यक्त केली. यावर चिमणराव पाटील यांनी “पुढे काय करता येईल ते बघू” असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.

फोनवरील व्यक्तीने चिमणराव पाटील यांच्याशी बोलत असताना ‘गुलाबराव पाटील यांनी शिवसेना संपवली,’ असे सांगितले असता आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले की, “हो..  यांनी जामनेर मध्ये शिवसेना वाढू दिली नाही, चाळीसगावमध्ये देखील शिवसेना वाढू दिली नाही. जळगाव जिल्ह्यात शिवसेना संपवण्यासाठी गुलाबराव पाटील कारणीभूत आहे दुसरे कोणी नाही”

कुठल्याही विकास कामासाठी गुलाबराव पाटील आले नसल्याचे शिवसैनिकाने सांगताच आ. पाटील म्हणाले, “ते येऊच शकत नाही. ते फक्त दोन-तीन वेळा दिसले होते. एकदा माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचा दौरा होता त्यावेळेस, आणि एका कोणत्यातरी उद्घाटनाच्या प्रसंगी ते दिसले. त्यावेळीही आम्ही इकडे विरोध करत असताना गुलाबराव पाटील त्यांच्यासोबत चहापानाला निघून गेले होते, असे ते म्हणाले.

शेवटी फोनवरील व्यक्तीने, “मी देवाला देखील साकडे घालतो की, तुमचं मन परिवर्तन होऊन तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत येऊन त्यांच्याशी संपर्क साधाल. आपण आपल्या कार्यकर्त्याच्या वेदना समजून घ्या.” असे काकुळतीने सांगितलेले दिसते.

हा ऑडिओ सध्या जिल्ह्यात जोरदार फिरत असून याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान हे संभाषण करणारी व्यक्ती कोण, कोणत्या उद्देशाने हा फोन केला, याबाबत ठोस माहिती प्राप्त झाली नसून मंत्री पदाच्या शर्यतीतून चिमणराव पाटील यांना काढण्यासाठी हा काही प्रयत्न आहे का? किंवा यामागे आणखी कोणता राजकीय हेतू आहे?  याबाबत चर्चांना उधान आले आहे.

असे असले तरी सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, शिंदे गटाने केलेली बंडखोरी पाहता आणि त्यातल्या त्यात आमदार चिमणराव पाटील व गुलाबराव पाटील यांच्यातील आढेवेढे पाहता, खरंच एखाद्या शिवसैनिकाचे हे काकुळतीचे बोलणे असावे काय? असा देखील सवाल उपस्थित होत आहे. याबाबत जळगावच्या राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत. या संभाषणाचे पुढचे पडसाद नेमके काय होतील? चिमणराव पाटील पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देतील का? किंवा या झालेल्या या संभाषणाकडे दुर्लक्ष करून, ते आहे त्या ठिकाणीच राहतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.