Sunday, November 27, 2022

आ. राजू मामा गरजले : आयुक्तांना धरले धारेवर

- Advertisement -

लोकशाही संपादकीय लेख

- Advertisement -

जळगाव शहराचे भाजपचे आमदार सुरेश उर्फ राजू मामा भोळे पहिल्यांदा शहरवासीयांच्या समस्या संदर्भात आयुक्त झालेले आक्रमक झालेले दिसले. यांच्या आमदारकीची ही दुसरी टर्म. गेल्या आठ वर्षाच्या कालावधीत त्यांच्याकडे अकार्यक्षम आमदार म्हणून बोट ठेवण्यात येत होते. परंतु दोन वर्षांवर विधानसभेची निवडणूक आहे. गेली आठ वर्षे जळगावकर नागरिक नागरिसुविधा नसल्याने त्रस्त आहेत. आरोग्य समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, विजेची समस्या, त्याचबरोबर शहरातील रस्त्यांच्या समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. परंतु शहराचे आमदार गप्प होते. त्यामागचे कारण मामा समजत नव्हते. तथापि भाजपच्या आपापसातील मतभेदांमुळे आमदार भोळे हतबल असल्याचे दिसून आले. 2019 विधानसभा निवडणुकीच्या वर्षाआधी झालेल्या मनपा निवडणुकीत व तत्कालीन पालकमंत्री भाजप नेते विद्यमान ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावकरांना विकासाचे आश्वासन दिले होते.

- Advertisement -

- Advertisement -

भाजपला मनपा पूर्ण बहुमत जळगावकरांनी दिले. जळगावच्या विकास झाला नाही, तर आमदार भोळे यांच्यासाठी निवडणुकीत मते मागायला येणार नाही, असे जाहीर आश्वासन दिले होते. 2018 च्या मनपा निवडणुकीत जळगावकरांनी भाजपच्या पारड्यात भरभरून मतदान केले. दोन तृतीयांश पेक्षा जास्त मतदान भाजपला मिळाले. परंतु त्यानंतर वर्षभरात जळगावच्या विकासावर कवडीचीही भर पडली नाही. उलट अनेक समस्या जैसे थे होत्या. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्मामुळे आणि भाजप शिवसेना युतीमुळे भाजप शहर विधानसभा मतदारसंघात आमदार राजू मामा भोळे यांना जळगावकरांनी निवडून दिले. तथापि गिरीश महाजन यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही. ते जळगावकर विसरले नाहीत.

जळगाव मनपा भाजपचे प्रचंड बहुमत असताना सुद्धा अडीच वर्षाच्या कालावधीत भाजपच्या महापौर आमदार पत्नीला राजीनामा द्यावा लागला. याला कारणीभूत आमदार राजू मामा भोळे होते. शहराचे आमदार आणि पत्नी शहराच्या महापौर असल्याने जळगाव शहर विकास झपाट्याने होईल, ही अपेक्षा जळगावकरांची फोल ठरली. आमदार भोळेंचा हा बॅड पॅच दूर करण्यासाठी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या पत्नी भारती सोनवणे यांना वर्षभरासाठी महापौर करण्यात आले. या कालावधीत कैलास सोनवणे यांनी शहराच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी भाजपातील अंतर्गत मतभेदाला सामोरे जाता जाता नाकी नऊ आले. आणि गेल्या दीड वर्षांपूर्वी भाजपा फूट पडली.

जळगाव मनपावर शिवसेना उद्धव ठाकरेंचा भगवा फडकला. त्यावेळी विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन नागरी विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सेनेचा भगवा फडकला जयश्री महाजन या महापौर पदी विराजमान झाल्या. शहराच्या विकासाच्या हालचाली सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी कोसळली. गेल्या चार महिन्यापासून महापौर जयश्री महाजन आणि त्यांच्या गटाला विकासासाठी राजकीय अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

हेल्थ सेंटरच्या शिबिरात जळगाव मनपाने जळगावकरांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. केंद्र शासनाचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगून आमदार राजूमामा गोळे यांनी आयुक्तांवर ताशेरे ओढले. कर न भरणाऱ्यांना काळ्या यादी टाकून त्यांच्या घरासमोर डफ वाजवणाऱ्या मनपाने नियमित कर भरणाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा त्यांची माफी मागावी, असा इशारा मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांना देण्यात आला. आमदार राजूमामा यांनी जनतेच्या प्रश्नासाठी आयुक्तांना जाब विचारला त्याबद्दल प्रथम त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. कारण गेल्या आठ वर्षाच्या कालावधीत जळगावकरांच्या समस्यांविषयी ब्र शब्द न काढणाऱ्या, जळगाव शहराचे प्रतिनिधित करणाऱ्या भोळे पहिल्यांदा आवाज उठवला ही चांगली बाब आहे. कारण प्रत्येक विकास कामात मलिदा खाणारा आमदार म्हणून विरोधक त्यांच्यावर आरोप करत होते.

शहराचे आमदार कुठे गेले? असा प्रश्नही विरोधक उपस्थित करून त्यांच्या अकार्यक्षमतेवर हल्लाबोल करत होते. उशिरा का होईना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार गोळे यांनी जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवला. राज्यात आणि केंद्रात त्यांची सत्ता आहे. विकास निधी खेचून आणून दोन वर्षाच्या कालावधीत जळगाव शहराचा कायापालट केला, तरच आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आपले भवितव्य आजमाऊ शकतील. अन्यथा विरोधकांतर्फे अनेक जण विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेले आहेत. त्यामुळे 2024 ची विधानसभा निवडणूक आमदार राजू मामांसाठी अडचणीची ठरणार आहे. कारण जळगावच्या रस्त्यांनी तर कहर केला आहे. आमदार राजू मामांसाठी जळगावचे रस्ते आगामी विधानसभा निवडणुकीत फार मोठे आव्हान ठरणार आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या