चिंचोली येथील महिलांसाठी मासिक पाळी व आरोग्य विषयक व्याख्यान

0

लोकशाही न्युज नेटवर्क

के. सी. ई. सोसायटी संचालित मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी द्वारे मासिक पाळी आणि आरोग्याविषयी जागृत करण्याच्या उद्देशाने जाहीर व्याख्यान या जनजागृती विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम जि. प. प्राथमिक मराठी शाळा, चिंचोली याठिकाणी आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमात त्यानंतर योगाचार्य डॉ. देवानंद सोनार यांचे ‘महिलांच्या आरोग्यासाठी योग साधना ‘ या विषयावरील जाहीर व्याख्यान संपन्न झाले. यावेळी त्यांनी विविध योगिक प्रक्रियांचा आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल याविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. त्याचबरोबर निसर्गोपचार तज्ञ प्रा. सोनल महाजन यांनी मासिक पाळी विषयीचे समज – गैरसमज आणि त्यासंबधीत विकारावर नैसर्गिक कोणकोणते उपचार करता येवू शकतात, पाळीच्या दिवसात स्वत:ची निगा कशी राखावी याविषयी मार्गदर्शन करून उपस्थित महिलांच्या प्रश्नांचे समाधानही केले. मू. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सं. ना. भारंबे यांचे अमूल्य योगदान व मार्गदर्शनामुळे अशा प्रकारच्या संवेदनशील परंतु आवश्यक विषयाच्या बाबतीत जनजागृती करण्याचे कार्य यशस्वीपणे केले जात असल्याची भावना डॉ. देवानंद सोनार यांनी यावेळी व्यक्त केली. उपस्थित महिलांनी आपल्या घरातील मुलींना आणि इतर महिलांना या बाबतीत माहिती देवून त्यांचे मासिक पाळीच्या सबंधित समसयांविषयीचे अज्ञान दूर करावे असे आवाहन चिंचोलीच्या सरपंच सुमित्रा अनिल सोळुंके यांनी यावेळी केले.
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायत चिंचोली सदस्या मनिषाताई पाटील, कार्यक्रमाच्या आयोजिका चिंचोलीच्या सरपंच सुमित्रा अनिल सोळुंके, सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी चे संचालक डॉ. देवानंद सोनार, नॅचरोपॅथी समन्वयक प्रा. सोनल महाजन, प्रा. पंकज खाजबागे, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा वाघ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कु. स्वप्नाली महाले, प्रशांत सोळुंके, आनंदा साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी चिंचोली, प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोली येथील आशा वर्कर स्टाफ आणि जि. प. प्राथमिक शाळेतील शिक्षिका शिक्षकवृंद यांनी अथक परिश्रम घेतले. चिंचोली गावातील अंदाजे १२० महिलांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.