लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईतील चेंबूर परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. आरसीएफ गाव परिसरात एका २४ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे तरुणी २ महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले आहे. बॉयफ्रेंडने दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून तरुणीला कोल्ड्रिंक्समध्ये डांबर गोळ्या मिसळून दिल्याने तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तिचा प्रियकर आशिष मगर याला अटक केली असून, त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव विष्णुमाया असे आहे. ही घटना चेंबूरमधील आरसीएफ गाव परिसरातील म्हैसूर कॉलनीतील बंगला क्रमांक ५७-अ येथे घडली. २५ ते २६ ऑगस्टदरम्यान विष्णुमायाची प्रकृती अचानक बिघडल्याचे समोर आले. ती तिच्या खोलीत बेशुद्धावस्थेत आढळून आली. कुटुंबीयांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
विष्णुमायाच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांनी सुरुवातीपासूनच संशय व्यक्त केला. पोलिसांच्या माहितीनुसार, आशिष मगरने सुरुवातीला हा प्रकार नैसर्गिक मृत्यू असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मात्र पोलिसांनी तपासाची दिशा बदलत तिच्या कुटुंबीयांसह या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू केली. घटनास्थळावरील परिस्थिती आणि उपलब्ध पुराव्यांचीही पोलिसांनी तपासणी केली.
तपासादरम्यान पोलिसांना आशिष मगरने विष्णुमायाला ‘थम्स अप’मध्ये डांबर गोळ्या मिसळून दिल्याचा संशय आल्याचे सांगण्यात येत आहे. दुसऱ्या व्यक्तीसोबत तिचे संबंध असल्याच्या संशयातून त्याने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास आरसीएफ पोलिसांकडून सुरू असून या घटनेचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांकडून उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि इतर बाबींची पडताळणी केली जात आहे. दरम्यान, आशिष मगरला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, तपासातून या प्रकरणातील आणखी तथ्ये समोर येण्याची शक्यता आहे.


