श्रीलंकेकडून PM मोदींना ‘मित्र विभूषण’ पुरस्कार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांना श्रीलंकेकडून ‘मित्र विभूषण’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. मोदींनी जगभरातील अनेक देशांना आजवर भारत सरकारच्यावतीनं भेटी दिल्या आहेत. या भेटींमध्ये त्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आले.  तसंच अनेक देशांनी त्यांना आपल्या सर्वोच्च तसंच महत्वाच्या पुरस्कारांनी गौरवलं आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींना आत्तापर्यंत २२ देशांनी आपल्या सर्वोच्च आणि महत्वाच्या पुरस्कारांनी गौरवलं आहे. यंदा श्रीलंकेच्या सरकारनं त्यांना गौरवलं हा पुरस्कार त्यांचा २२ वा विदेशी पुरस्कार ठरला आहे. आशियाई, युरोपियन, अफ्रिकन तसंच भारतीय उपखंडातील देशांनी आजवर पंतप्रधानांना गौरवण्यात आला आहे.

श्रीलंकेच्या राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘मित्र विभूषण’ पुरस्कारानं गौरविण्यात आलं. द्वीपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी तसंच दोन्ही देशांमधील सांस्कृतीक आणि आध्यात्मिक वारशाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना या पुरस्कारानं भारताच्या पंतप्रधानांना गौरविण्यात आलं आहे.

काय म्हणाले मोदी ? 

श्रीलंकेकडून मला मित्रभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं जाणं ही माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. भारत-श्रीलंकेच्या दृढ संबंधांचं हे प्रतिक आहे. हा सन्मान केवळ माझा सन्मान नसून १४० कोटी भारतीयांचा सन्मान आहे. भारत आणि श्रीलंकेमधील ऐतिहासिक संबंधांचा हा गौरव आहे, असं मोदी म्हणाले.

पुरस्काराचे वैशिष्ट्य ?

श्रीलंकेच्या या मित्र विभूषण सन्मान चिन्हामध्ये धम्मचक्र आहे, जे बौद्ध धर्माचा वारसा सांगतं. भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांच्या सांस्कृतीक परंपरांना यामुळं आकार दिला आहे. तांदळाच्या पिकाच्या लोंब्यांचा याच्या डिझाईनमध्ये समावेश आहे. मध्यभागी एक कलश असून तो समृद्धी आणि नवचैतन्याचं प्रतिक असल्याचं सांगितलं जातं. या कलशाभोवती नवरत्न अर्थात नऊ मौल्यवान रत्न आहेत. त्याच्याभोवती फुलांच्या पाकळ्याही दिसत आहेत. तर या पदकाच्या वरती सूर्य आणि चंद्र दिसत आहेत, जे प्राचीन भूतकाळापासून भविष्यातील अनंत काळ दर्शवतात.

Leave A Reply

Your email address will not be published.