वरणगावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपी अटकेत

0

वरणगाव (ता. भुसावळ) – येथील सम्राटनगर परिसरात अल्पवयीन मुलींशी विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणी आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १२६(२), ३३३, ३५१(१)(२), ७५(२) तसेच बाल लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ अंतर्गत कलम ८ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिला (वय ३५, व्यवसाय मजुरी, रा. वरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, २६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आरोपी सुरेश जयराम मोरे (रा. सम्राटनगर, वरणगाव) याने फिर्यादीच्या घरी येऊन त्या वेळी घरी एकट्याच असलेल्या त्यांच्या १२ व ९ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केले. यावेळी आरोपीने मोठ्या मुलीशी अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न करून घटनेची वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास, शाळेत जात असताना आरोपीने सम्राटनगर परिसरात मोठ्या मुलीचा हात धरून तिला घरात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेची नोंद २८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.२४ वाजता करण्यात आली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेडकोळी हे करीत असून पुढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.