यावल शहर, लोकशाही न्यूज नेटवर्क

यावल पोलिसांनी बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राज्य महामार्गावर केलेल्या नाकाबंदीदरम्यान चोपड्याकडून यावलकडे येणाऱ्या एका ट्रकमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा आणि १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आढळून आली. दोघांनी स्वतःला प्रेमी युगुल असल्याचे सांगितले. दरम्यान, ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने पोलिसांना संशय आला. ट्रकमध्ये चालकासह हे दोघेच असल्याने पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आणि गुरुवारी (दि. २५ जून) मुलीला सुखरूप तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
यावल पोलिसांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे आणि दक्षतेमुळे अल्पवयीन मुलगी सुखरूपपणे आपल्या कुटुंबाकडे परतली. मंगळवारी मध्यरात्रीनंतर पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, पोलीस हवालदार एजाज सलीम गवळी, हवालदार अर्षद कासम गवळी, वरिष्ठ पोलीस नाईक पंकज फिरके आणि पोलीस वाहनचालक ज्ञानेश्वर सपकाळे हे चोपडा-यावल मार्गावर नाकाबंदी करत होते. त्यावेळी ट्रक क्रमांक जीजे-10-टीव्ही-7323 भरधाव वेगाने यावलकडे येत होता. पोलिसांनी तो थांबवून चौकशी केली असता चालक अमोल शंकर जयप्रकाश पांडे (रा. भगवानपूर, बिहार) हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले.
चालकाने वाहनात अन्य कोणी नसल्याचे सांगितले. मात्र त्याच्या संशयास्पद उत्तरांमुळे पोलिसांनी ट्रकची झडती घेतली. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील उपरखेड येथील १७ वर्षीय मुलगा आणि नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील अभनपूरा बुद्रुक येथील १४ वर्षीय मुलगी आढळून आली.
पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांना तसेच ट्रकचालकाला ताब्यात घेतले. मुलीच्या पालकांना माहिती देण्यात आली. गुरुवारी तिचे आई-वडील पोलीस ठाण्यात आल्यानंतर मुलीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. मुलगी सुखरूप परत मिळाल्याने तिच्या कुटुंबीयांनी यावल पोलिसांचे आभार मानले.
अशी झाली ओळख; गावातून केले पलायन
अल्पवयीन मुलगी तिच्या मावशीकडे राहत होती. मावशीचे कुटुंब चाळीसगाव तालुक्यातील एका गावात ऊसतोडणीसाठी गेले होते. त्याच ठिकाणी उपरखेड (ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील १७ वर्षीय मुलगाही आपल्या कुटुंबासह ऊसतोडणीसाठी आला होता. तेथे दोघांची ओळख झाली. २३ जून रोजी मुलगा अभनपूरा बुद्रुक येथे आला आणि तेथून दोघे शिरपूरला गेले. त्यानंतर त्यांनी संबंधित ट्रकमध्ये बसून भुसावळकडे जाण्याचा प्रयत्न केला.
प्रसंगावधानामुळे टळला मोठा अनर्थ
ट्रकचालक प्रचंड मद्यधुंद अवस्थेत होता. अशा परिस्थितीत त्याच्याकडून कोणताही गंभीर प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. दोघेही अल्पवयीन असल्याने संभाव्य गंभीर गुन्हा घडण्याची भीती होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी चालकालाही ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांच्या, तर मुलाला त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले, अशी माहिती पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी आमचे यावल शहर प्रतिनिधी सुपडू संदानशिव यांच्याशी बोलताना दिली.


