राज्यातील सर्वच दूध संघ खरेदी दरात १ एप्रिलपासून दोन रुपयाची वाढ

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

सोलापूर : राज्यातील सर्वच दूध संघ खरेदी दरात १ एप्रिलपासून दोन रुपयाची वाढ करीत शेतकऱ्यांच्या हातात प्रति लिटरला ३५ देण्याचा निर्णय दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी घेतला आहे. सोनाई पाठोपाठ जिल्हा संघानेही दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्वच दूध संघ खरेदी दरात वाढ करणार आहेत. सध्या देशभरात दूध व दूध पावडरची कमतरता भासत आहे.

त्यापटीत दुधाचा पुरवठा होत नाही. त्याचा परिणाम दूध दर वाढीवर होत आहे. सध्या सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ, सोनाई, नॅचरल, उर्जा व इतर प्रमुख दूध संघ गाईच्या दुधाला प्रति लिटर ३३ रुपये दर देत आहेत. शेतकऱ्यांना ३३ रुपये व वाहतूक कमिशन दोन रुपये दिले जात आहे.

१ एप्रिलपासून दोन रुपयाची वाढ होणार असल्याने सोलापूर जिल्हा दूध संघ व सोनाई दूध संघाला दूध घालणाऱ्या दूध उत्पादकांना प्रति लिटर ३५ रुपये व वाहतूक कमिशन दोन रुपये, असे प्रति लिटर ३७ रुपये खर्च होणार आहे. दूध संघावर दरवाढीचा वाढता बोजा पडणार असला तरी शेतकऱ्यांसाठी तो सहन करावा लागणार असल्याचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी सांगितले.

दूध संघ ज्यावेळी शेतकऱ्यांना प्रति लिटर २५ रुपये दर देत होता, त्यावेळी एजंटांना ३५ रुपयाने दूध दिले जात होते. आता शेतकऱ्यांना प्रति लिटरला ३५ रुपये दर द्यावा लागत असला तरी एजंटांना ४१ रुपयाने दूध दिले जाणार आहे. संघ व एजंट यांच्यातील दरात अवघा प्रति लिटर ६ रुपये फरक राहिला आहे.

नोव्हेंबर महिन्यात गायीचे दूध खरेदी दर प्रति लिटर २५ रुपये होता. पाच महिन्यानंतर तो १० रुपयाने वाढून ३५ रुपये होत आहे. यातील केवळ मार्च महिन्यात चार रुपये, तर १ एप्रिलला दोन रुपयाची वाढ होत आहे.

सोलापूर जिल्हा दूध संघ व जिल्ह्यातील इतर खासगी दूध संघांनी जानेवारी व फेब्रुवारी २०२० मध्ये गायीचे दूध खरेदीसाठी प्रति लिटरला ३१ रुपये दर देत होता. हा दराचा उच्चांक मोडत प्रथमच ३५ रुपये दर मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.