जळगाव : जळगाव शहरातील रिलायन्स पेट्रोलपंपसमोरील टी.एम. नगर परिसरात नव्याने बांधकाम सुरू असलेल्या घरामधून नळफिटिंग व लाईट फिटिंगचे साहित्य चोरी करणाऱ्या चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे २८ हजार रुपये किमतीचे चोरीस गेलेले साहित्य हस्तगत केले आहे.
दि. २८ डिसेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ते २९ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजेच्या दरम्यान, जळगाव शहरातील सर्वे नं. ५११ ते ५१४ येथील नव्या बांधकामाच्या घराचा कडी-कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी नळफिटिंग व लाईट फिटिंगचे साहित्य चोरीस नेले होते. याप्रकरणी फिर्यादीने दि. ७ जानेवारी २०२६ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा रजिस्टर नं. २५/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाची विशेष टीम तयार केली. या पथकात पोउपनि राहुल तायडे, पोउपनि चंद्रकांत धनके, सफौ ०५ विजयसिंग पाटील, पोहेकॉ रमेश चौधरी, पोका गणेश ठाकरे, नितीन ठाकुर, राहुल घेटे, किरण पाटील यांचा समावेश होता.
पथकाने घटनास्थळ तसेच जळगाव शहरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. नेत्रम विभागातील पोकॉ पंकज खडसे, कुंदनसिंग बयस व मुबारख देशमुख यांच्या मदतीने फुटेजची बारकाईने पाहणी करून तसेच बातमीदारांच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेण्यात आला. त्यानुसार सैय्यद उबेद सैय्यद रफीक पटवे (वय १९, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याचा साथीदार हा विधिसंघर्षित बालक असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी सैय्यद उबेद याच्याकडून एकूण २८ हजार रुपये किमतीचे नळफिटिंग व लाईट फिटिंगचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सफौ ०५ विजयसिंग पाटील व पोकॉ निलेश पाटील करीत आहेत.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.