मेहरुण बोरांची अस्तित्वासाठी धडपड!

0

 

लोकशाही संपादकीय लेख

जळगाव शहरालगतच्या मेहरुण शिवारातील बोरांची चव, त्यांची गोड आठवण आणि त्यामागे दडलेली स्थानिकांची उपजीविका हे सर्व आज अस्तित्वासाठी झुंज देत उभे आहे. एकेकाळी या परिसरात दाट बोरांची झाडी होती. हिवाळ्याच्या आगमनासोबतच या बोऱ्यांचा सुगंध आणि चव स्थानिक बाजारपेठांना उजाळा देत असे. अनेक कुटुंबांचे अर्थचक्र या झाडांभोवती फिरत असे. पण बदलत्या जमिनीच्या किमती, वाढती शहरीकरणाची लाट आणि जमिनीच्या एन.ए. प्रक्रियेमुळे या बोरांच्या संसारावर कुऱ्हाड कोसळली. आज काही मोजकी झाडे शेताच्या बांधावर जीव धडपडत उभी असली, तरी त्यांचे संगोपन न झाल्याने त्यांच्यावर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ही परिस्थिती केवळ एका झाडाची नव्हे, तर एका परंपरेची, एका चवीची आणि स्थानिक अर्थव्यवस्थेची झळ आहे. मेहरुण शिवारातील बोरे ही केवळ साधी फळे नाहीत, तर त्या भूमिच्या ओळखीचा एक महत्त्वाचा भाग आहेत. बदलत्या काळासोबत अनेक पिकांनी आपली बाजारपेठ गमावली; पण या बोऱ्यांनी मात्र त्यांच्या चवीमुळे आणि नैसर्गिक वैशिष्ट्यांमुळे नेहमीच ग्राहकांची पसंती मिळवली आहे. आजही बाजारात जेव्हा हे बोरे येतात, तेव्हा ग्राहक त्यांना उचलून धरतात. मग प्रश्न असा पडतो की, लोकांची मागणी आणि चव आजही कायम असताना ही झाडे मात्र नष्ट होण्याच्या मार्गावर कशी काय पोहोचली? प्रत्यक्ष उत्तर आहे आपली बेदखली आणि गैरजबाबदारी. ‘हातचे सोडून दुसऱ्याचे घेणे’ ही प्रवृत्ती समाजात वाढली आहे. आपल्यातील अनेकजण पारंपरिक आणि स्थानिक फलोत्पादनापेक्षा बाहेरील आणि अधिक आकर्षक पॅकेजिंगमध्ये मिळणाऱ्या फळांकडे धाव घेत आहेत. आज ॲपल बोऱ्यांची बाजार तेजीत आहे. त्यांच्या चमकदार सादरीकरणाने आणि व्यापारी नेटवर्कने ग्राहकांपर्यंत सहज पोहोच साधली. स्थानिक बोरे मात्र अशा व्यावसायिक स्पर्धेत मागे पडली. अस्सल चवीपेक्षा बाह्यस्वरूपाला महत्त्व दिल्याने मेहरुणच्या बोऱ्यांना आपली ओळख टिकवणे कठीण झाले आहे.

या बोऱ्यांचा इतिहास सांगतो की, योग्य काळजी, योग्य संवर्धन आणि मार्केटिंगचा मजबूत आधार मिळाला, तर ही झाडे केवळ टिकतीलच नाहीत तर पुन्हा एकदा या परिसराच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ बनू शकतील. आजही काही झाडे शेताच्या बांधावर तग धरुन आहेत. परंतु त्यांची देखभाल कमी झाल्याने त्यांची उत्पादन क्षमता खालावली आहे. योग्य पद्धतीने छाटणी, पाणीपुरवठा, कीडनियंत्रण या गोष्टी केल्या तर त्यांचे उत्पादन वाढू शकते. या बोऱ्यांसाठी स्थानिक पातळीवर ब्रँडिंगची गरज आहे. मेहरुण बोरे ही केवळ फळे नसून ‘स्थानिक भूमीची ओळख’ अशी त्यांची प्रतिमा तयार केली जाऊ शकते. अनेक राज्यांमध्ये विशिष्ट फळांना ‘जीआय टॅग’ मिळून त्यांची ओळख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकवली गेली आहे. मग मेहरुण बोऱ्यांसाठीही असा विचार होऊ शकेल का? जर प्रशासन, कृषी विभाग, स्थानिक संस्था आणि शेतकरी, लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन अशा उपक्रमांना चालना दिली, तर या बोऱ्यांची अस्मिता वाचू शकेल.

शहरीकरणाच्या वाढत्या लाटेमुळे कृषी क्षेत्राची हानी होत असली, तरी सर्व दोष शहरी विकासावर टाकून चालणार नाही. झाडांचे महत्त्व, पर्यावरणाची गरज आणि आर्थिक फायदे या तिघांची सांगड घालणारी धोरणे बनविण्याची आवश्यकता आहे. ज्या भागात जमीन एन.ए. झाली, तिथेच किमान काही झाडे संरक्षित ठेवण्याची अट असायला हवी. एकेकाळी हजारो झाडे असलेल्या या शिवारात आता मोजकी झाडे उरली ही परिस्थिती समाजाच्या दुर्लक्षाची साक्ष देते. आजही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. योग्य संवर्धन आणि नियोजनाने ही झाडे पुन्हा फुलू शकतात. बोऱ्यांची मागणी आजही आहे; म्हणजेच बाजारपेठ तयार आहे. फक्त उत्पादन टिकवण्याची, वाढवण्याची आणि ते प्रभावीपणे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. याशिवाय, या बोऱ्यांवर आधारित स्थानिक गृहउद्योग विकसित होऊ शकतात. बोर चटणी, बोर पापड, बोर गोळे, बोरकुट, बोराचा सिरप अशा अनेक गोष्टींचे उत्पादन करून त्या बाजारात विक्रीसाठी आणल्या तर महिलांच्या स्वयंसहायता गटांना मोठा आर्थिक हातभार लागू शकतो. बोऱ्यांच्या उत्पादनावर आधारित पर्यटन संकल्पनाही राबविता येऊ शकते. ज्या झाडांनी एका पिढीचा उदरनिर्वाह साधला, त्या झाडांचे अस्तित्व वाचवणे ही आजची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. ही झाडे फक्त फळे देत नाहीत, तर मातीला, पर्यावरणाला आणि समाजाला समृद्ध करतात. त्यांना पुनर्जीवित करण्यात आली तर अनेक कुटुंबांच्या अर्थकारणात बदल होऊ शकतो.

मेहरुण बोरे ही आपली परंपरा आहे, आपली ओळख आहे, आणि ती जपणे आपले कर्तव्य आहे. विकास महत्वाचा आहेच, पण त्या विकासात स्थानिक संसाधनांचे जतनही तेवढेच महत्त्वाचे आहे. आज बोरे आपले अस्तित्व वाचवण्यासाठी लढत आहेत; पण उद्या ही लढाई आपणा सर्वांची होईल, जर आपण आज या झाडांकडे दुर्लक्ष चालूच ठेवले तर ते केवळ फोटोमध्ये दाखविले जार्इल, आता वेळ आली आहे की, स्थानिक प्रशासन, शेतकरी आणि नागरिक, लोकप्रतिनिधी एकत्र येऊन या झाडांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ठोस पावले उचलावीत. मेहरुण बोऱ्यांचा सुवास पुन्हा एकदा जळगावच्या बाजारपेठात दरवळावा, हे फक्त भावनिक नाही तर आर्थिकदृष्ट्याही आवश्यक आहे. बोरे टिकली तर परिसराची ओळख टिकेल; आणि ती टिकवण्यासाठी आजच पुढाकार घेणे गरजेचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.